नागपूर (Nagpur) : महापालिकेतील स्टेशनरी घोटाळ्यात आरोग्य विभागातील भांडारप्रमुख प्रशांत भातकुलकर यास अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून ७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण सहा आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अनेक बडे मासे यात गुंतले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
स्टेशनरी घोटाळ्याचा तपास सुरूवातीला सदर पोलिस ठाण्याचे एपीआय चितमपल्ली यांच्याकडे होता. आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता आता तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त डॉ. अक्षय शब्दे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रवीण कांबळे तपास करीत आहेत. प्रशांत भातकुलकर याला काला रात्री अटक करण्यात आली. सर्व आरोपी हे एकमेकांच्या परिचयातील असून त्यांनी बोगस कंपन्यांच्या नावाने ही बिले तयार केली असल्याचे तपासात पुढे आले.
यापूर्वी सदर पोलिसांनी स्टेशनरी पुरवठा करणारा कोलबा साकोरे त्याचा पुतन्या अतुल साकोळे, सामान्य प्रशासन विभागातील ऑडिटर अफाक अहमद, लिपिक मोहन पडवंशी, वित्त विभागातील अधिकारी राजेश मेश्राम यांना अटक केली आहे. आता भांडारप्रमुखला अटक केल्याने या प्रकरणाचा खुलासा होण्यास वेळ लागणार नाही, अशी मनपा वर्तुळात चर्चा आहे.
पाचही आरोपी कारागृहात आहेत. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून हार्डडिक्स जप्त केली आहे. त्यातील संपूर्ण माहिती गोळा करून मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरोग्य विभागातील ६३ लाखांचे देयके स्टेशनरीच्या पुरवठ्याशिवायच काढण्यात आली होती. त्यानंतर इतर विभागातील स्टेशनरी पुरवठ्याचे घोटाळे समोर आले आहे. या घोटाळ्यात महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकारी गुंतले असल्याची शंका सुरुवातीपासूनच व्यक्त केली जात आहे. अनेक विभागाप्रमुखांचे कंम्प्युटर पासवर्ड लिपिकच वापरत होते, असेही पुढे आले आहे.
स्टेशनरी घोटाळ्याचा सूत्रधार एक आयुक्त दर्जाचा अधिकारी असल्याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात आहे. स्टेशनरी घोटाळा उघडकीस आल्यानंतर संबंधित पुरवठादार कोलबा साकोरे याच्याकडून ५६ लाखांचा धनादेश परत घेण्यात आला होता. त्याकरिता तातडीने एका अधिकाऱ्याने हालचाली केल्या होत्या. घोटाळा समोर येऊ नये म्हणून यासाठी ही धडपड करण्यात आली होती असेही बोलले जाते.