नागपूर (Nagpur) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी समृद्धी महामार्गाला (Samrudhhi Mahamarg) गडचिरोलीपर्यंत नेण्याची घोषणा केली आहे. असे असले तरी नागपूर ते गडचिरोली आणि गोंदिया असा स्वतंत्र हायवे विकसित केला जाणार आहे. त्याचा 'समृद्धी'शी संबंध नसल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे उद्घाटन ११ डिसेंबरला होणार आहे. तयारीचा आढावा घेण्यासाठी मोपलवार नागपूरला आले होते. यावेळी त्यांनी नागपूर ते ठाणे एवढाच प्रवास समृद्धी महामार्गाचा राहाणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र नागपूर ते गडचिरोलीसाठी स्वतंत्र महामार्गाची निर्मिती राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत केली जाणार आहे. याशिवाय नागपूर ते गोवा आणखी एक नवा मार्ग विकसित केला जाणार आहे. दोन्ही रस्त्याचा डीपीआर तयार केला जाणार आहे. त्यानंतर टेंडर काढून या दोन्ही मार्गांची आखणी केली जाणार आहे.
'समृद्धी'च्या शिर्डी ते मुंबईपर्यंतच्या शेवटच्या टप्प्याचे काम जुलै २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 'समृद्धी'चा एकूण खर्च ५५ हजार कोटी रुपये इतका आहे. ७१० किमी लांबीचा सुपर द्रुतगती मार्ग १४ जिल्ह्यांतून जाणार आहे. समृद्धी महामार्ग हा पूर्णपणे ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे आहे. ताशी १२० किमी वेगाने जाण्यासाठी तयार आहे. ७१० पैकी ५२१ किलो मीटरचे काम झाले असून, उर्वरित १८० किलो मीटरचे काम सुरू आहे. या मार्गाने साडेचार तासांत नागपूर ते शिर्डी प्रवास करता येणार आहे. १.७५ रुपये प्रति किलोमीटर टोल टॅक्स लागणार आहे. यामुळे शिर्डीपर्यंतचे अंतर पार करण्यासाठी ९११ रुपये लागेल.
'गेल' सोबत करार करून समृद्धीला समांतर पाईप लाईन टाकण्यात आलेली आहे. अशा प्रकारचा देशातील हा पहिलाच एक्सप्रेस-वे आहे. वन्यजीवांचे भ्रमंती मार्ग खंडित होऊ नये म्हणून भारतीय वन्यजीव संस्थेने ८४ उड्डाण पूल आणि अंडर ब्रिज बांधण्याच्या सूचना केल्या होत्या. आम्ही १०० अशा प्रकारचे पूल बांधलेले आहेत. त्यातील ८ उड्डाणपूल, तर ९२ अंडरपास आहेत. संपूर्ण मार्गावर सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. समृद्धीच्या शेजारी ११ लाख ३१ हजार झाडे लावण्यात येणार आहे. याशिवाय २२ लाख वेलीही लावण्यात येणार असल्याचे मोपलवार यांनी सांगितले.