Nitin Gadkari : गडकरींच्या परिस्पर्शात विदर्भ 'विकास'च्या वाटेवर! असे का म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

Nitin Gadkari
Nitin GadkariTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : राज्याचे सांस्कृतिक कार्य व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी खासदार औद्योगिक महोत्सवात उपस्थित गुंतवणुकदारांना संबोधित केले. विदर्भात वन, पाणी, वीज, जागा उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला काय सुविधा हवी ते सांगा. आम्ही सगळे तत्पर आहोत. ज्यांच्या कर्तुत्वाला अवघ्या भारताने सलाम केला असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) या ठिकाणी मदतीला तयार आहेत. त्यांनी ज्या कामाला हात लावला त्याचे सोने होते. त्यामुळे विदर्भात गुंतवणुकीसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी त्यांनी वनविभागामार्फत एमआयडीसीच्या धरतीवर वनविभागावर आधारित उद्योगांची एमआयडीसी, प्रायोगिक तत्त्वावर चंद्रपूर येथे सुरू करत असल्याचे सांगितले.

Nitin Gadkari
नाशिक होणार वेअरहाउस हब; महिंद्रा लॉजिस्टिकची 500 कोटींची गुंतवणूक

कोणताही उद्योग उभारण्यासाठी वीज, पाणी, मध्यवर्ती ठिकाण व अन्य पायाभूत सुविधांची गरज असते. केंद्रीय रस्ते, महामार्ग व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून विदर्भातील रस्त्यांचे जाळे मजबूत व दीर्घकाळासाठी उत्तम झाले आहे. समृद्धी महामार्गामुळे एक वातावरण निर्मिती झाली आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये आवश्यक असणारी पुरवठा साखळी विदर्भात निर्माण झाली आहे. मोठे लॉजिस्टिक क्लस्टर आम्ही नागपूरमध्ये निर्माण करणार आहोत. लॉजिस्टिक कॅपिटल म्हणून नागपूरला जगामध्ये पुढे आणायचे आहे.

समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरकडे होणार आहे. नागपूर पासून मुंबई प्रमाणे गोवा महामार्ग आम्ही तयार करीत आहोत. त्याला शक्तीपीठ महामार्ग संबोधले जाईल. नागपूरचे नवीन विमानतळ जागतिक मानांकनाचे असेल याकडे आम्ही लक्ष वेधले आहे. सोबतच अमरावती, अकोला विमानतळाला अद्यावत करणार आहोत. गडचिरोलीमध्येही आमचे विमानतळ तयार होत आहे. चंद्रपूरचेही विमानतळ आम्ही लवकरच पूर्णत्वास घेऊन जाऊ, त्यामुळे रस्ते लोहमार्ग व विमान मार्गाने नागपूर व विदर्भ प्रत्येक प्रदेशाशी जोडला गेला आहे.

चार्मोशी पासून 'वॉटर वे' तेलंगनापर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे. वैनगंगा ते नळगंगा 550 किलोमीटरचा कॅनॉल आम्ही तयार करीत आहोत. 2024 मध्ये या कामाला सुरुवात होऊन सात वर्षात हा प्रकल्प पूर्ण व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. यामुळे विदर्भातील जास्तीत जास्त शेतीला पाणी पुरवठा करता येईल, असे मुनगंटीवार म्हणाले.

Nitin Gadkari
CIDCO : सिडकोचा डबलधमाका; 3322 सदनिकांच्या सोडतीची घोषणा; किंमतही 6 लाखांनी कमी

गडचिरोली होणार पोलाद उद्योगाचे हब

गडचिरोली जिल्ह्यामध्ये लोह उद्योगाचा पाया रचला असून, याठिकाणी उत्तम भविष्य दिसून येत आहे. मुख्यमंत्री असताना सुरू केलेला लोह उद्योग आता विस्तारित होत असून, लवकरच गडचिरोली पोलाद उद्योगाचे हब होईल याची मला खात्री आहे.

केवळ नागपूर नव्हे संपूर्ण विदर्भातील सर्व जिल्हे विकसित व्हावे व त्यादृष्टीचे नियोजन, क्लस्टर निर्मितीला आणि प्राधान्य देत आहोत. याशिवाय कोळशावर तयार होणाऱ्या गॅसपासून (कोल गॅसीफिकेशन) घरगुती वापराच्या गॅस निर्मिती संदर्भात चंद्रपूरमध्ये काही प्रयोग यशस्वी होण्याची शक्यता आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे.

भांडवल, पायाभूत सुविधा यासोबतच मनुष्यबळांची आवश्यकता ही महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे नागपूरमध्ये मनुष्यबळ कौशल्य युक्त व्हावे यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. संरक्षण, पर्यटन या क्षेत्रांतही मोठे उद्योग उभारण्याची विदर्भात संधी आहे. स्टार्टअप इकोसिस्टीम डेव्हलप करण्याचेही आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com