नागपूर (Nagpur) : रामदासपेठ ते महाराजबागकडे जाणाऱ्या मार्गावरील नागनदीवरच्या पुलाच्या बांधकामाचा कालावधी संपला असताना कंत्राटदाराला पाठीशी घालणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या विरोधात अजित पवार समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कार्यकत्यांनी रस्त्यावर बसून दोन तास आंदोलन केले.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून भजन, कीर्तन केले. दोन वर्षांपासून या पुलाचे बांधकाम सुरू आहे. मुदत संपल्यानंतरही काम अद्याप पूर्ण केलेले नाही. दुसरीकडे पुरामुळे पंचशील चौकातील पूल खचल्याने तो बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असतानाही कंत्राटदार कुठलीच घाई करताना दिसत नाही. 31 ऑक्टोबर ला मुदत संपल्या नंतर ही कंत्राटदाराला दोन महिन्यांची मुदत का देण्यात आली? याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
जोपर्यंत आयुक्त किंवा अधिकारी या आंदोलन स्थळी येणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर धरमपेठ झोनचे सहाय्यक आयुक्त प्रकाश वराडे यांनी भेट दिली. त्यांनी 31 जानेवारीपर्यंत पुलाचे बांधकाम पूर्ण करू, असे आश्वासन दिले. यानंतर विलंब झाल्यास सर्वस्वी जबाबदारी वराडे यांची राहील आणि यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रशांत पवार यांनी दिला. आंदोलनात राज्य महिला आयोग सदस्य आभा पांडे, कार्यकारी अध्यक्ष श्रीकांत शिवणकर, प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहीरकर, राजेश माटे, विशाल खांडेकर, अरविंद ढेंगरे, सोहेल पटेल, रवी पराते, विश्वजित तिवारी, संदीप सावरकर, इकबाल अंसारी, राजू मिश्रा, जयंत किनकर, निलिकेश कोल्हे, मिलिंद महादेवकर, नागेश देठमुठे, भारती गायधने, सौरव दुबे, विशाल खरे, निखिल चाफेकर, संजय पाटील, अनिकेत खोब्रागडे आदी सहभागी झाले होते.