नागपूर (Nagpur) : पंचायत राज समितीच्या (पीआरसी) स्वागतासाठी प्रशासनाने रेडकार्पेट टाकले असले तरी जिल्हा परिषदेच्या बांधकाम, शिक्षण तसेच पाणी पुरवठा विभागातील अनियमिततेवर बोट ठेवत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. बांधकाम व शिक्षण विभागाच्या सचिवांची ते साक्ष नोंदविणार आहेत. त्यामुळे दोन्ही विभागातील तत्कालीन व विद्यमान अधिकारी चांगलेच अडचणीत येणार असल्याचे बोलल्या जात आहे. तर काही विभागाच्या कामकाजावर असमाधान व्यक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले.
संजय रायमुलकर यांच्या अध्यक्षतेत पीआरसीचा तीन दिवसीय दौरा आजपासून सुरू झाला. आज समितीने २०१६-१७ व वर्ष २०१७-१८ या काळात घेण्यात आलेल्या आक्षेपावरील करण्यात आलेल्या कार्यवाहीचा तसेच कामाचा आढावा घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकरसर विद्यमान व तत्कालीन विभाग प्रमुख हजर होते. विभागनिहाय माहिती घेण्यात आली. बांधकाम विभागाकडून करण्यात अनेक कामात अनियमितता झाल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. यावर विभाग प्रमुखांकडून समाधानकारक उत्तर देता आले नाही. शिक्षण विभागाबाबत असाच प्रकार घडला. शिक्षणाधिकारी यांनी नवीन असल्याचे सांगितले. नवीन असला तरी अधिनस्त अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून माहिती घेऊन कार्यवाही केली नाही. नवीन आहात, हे कारण योग्य नाही’, असे म्हणत अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांची साक्ष नोंदविण्याचे आदेश त्यांनी दिले. ग्रामीण पाणी पुरवठा व लघुसिंचन विभागाला चांगलेच फैलावर धरले. दोन्ही विभागाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश अध्यक्षांनी कुंभेजकर यांना दिले. आरोग्य, पशुसंवर्धन, पंचायत विभागाच्या कामावर असमाधान केल्याची माहिती आहे.
मंगल कार्यालयात व्यवस्था केली का?
बैठकीच्या सुरवातीलाच समितीने ‘व्यवस्थे’बाबत विचारणा केली असता राणी कोठीत निवास व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. मंगल कार्यालयात व्यवस्था केली का? रविभवन, आमदार निवास असे सरकारी निवासस्थान असताना मंगल कार्यालयात व्यवस्था केली. इतर ठिकाणी चांगली व्यवस्था झाल्याचे सांगत समितीने नागपूरच्या निवास व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली.
स्वागतासाठी रेडकार्पेट
रविभवन येथे पदाधिकाऱ्यांशी अनौपचारिक चर्चा केल्यानंतर दुपारी समिती अध्यक्ष संजय रायमुलकर व सदस्य जिल्हा परिषदेत आले. त्यांच्या स्वागतासाठी रेडकार्पेट टाकण्यात आले आले आहे. त्यांच्या स्वागताचे फलकही जागोजागी लावण्यात आले होते. शिवाय प्रवेश द्वारावरही सुंदर रांगोळी टाकण्यात आली होती.
हे आहेत समितीत
समिती प्रमुख संजय रायमुलकर, आमदार कैलाश पाटील, शेखर निकम, सुभाष धोटे, प्रतिभा धानोरकर, देवराव होळी, कृष्णा गजबे, किशोर जोरगेवार, अंबादास दानवे, विक्रम काळे, अमरनाथ राजूरकर, निरंजन डावखरे, किशोर आप्पा पाटील, किशोर दराडे, रत्नाकर गुट्टे, महादेव जानकर, विजय गावित आदी सदस्यांचा समावेश आहे.