नागपूर (Nagpur) : अनेक घोटाळे उघडकीस आल्यानंतरही जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाचा कारभार सुधारण्याऐवजी अधिकच बिघडत चालला आहे. यापूर्वीच छुप्या पद्धतीने कारभार चालायचा. आता मात्र या विभागाने टेंडर काढण्यापूर्वीच कार्यादेश देऊन आमचे कोणी काही बिघडवू शकत नाही असे अप्रत्यक्ष आव्हानच सरकारला दिले आहे.
सुरक्षा ठेव घोटाळा लघु सिंचन विभागीतूनच समोर आला होता. या प्रकरणी तीन कर्मचाऱ्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. विभाग प्रमुखही संशयाच्या भोवऱ्यात आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून मार्च महिन्यातच निधी आला असताना कामे करण्यात आली. काही कंत्राटदाराच्या हितासाठी कामांना विलंब करण्यात आल्याची चर्चा होती. आता भंडारबोडीत नियमबाह्यरित्या काम होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथे एक दहा लाखांच्यावरचे काम आहे. नाला बंधाराचे हे काम आहे. १० लाखांच्यावरचे काम असल्याने नियमानुसार त्याची निविदा निघणे आवश्यक होते. टेंडरमध्ये पात्र ठरणाऱ्या व्यक्तीस काम देणे आवश्यक होते. परंतु टेंडर काढण्याच्यापूर्वीच कार्यादेश देण्यात आल्याची माहिती आहे. यात मोठा गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे. लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता बंडू सयाम यांना याबाबत विचारणा करण्यासाठी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असतात प्रतिसाद दिला नाही.
लघु सिंचन विभागाकडून नियमबाह्य काम होत आहे. भंडारबोडीत टेंडर करण्यापूर्वीच काम देण्यात आले. आता मागच्या तारखते कार्यादेश देण्याचा प्रयत्न सुरू आहे. काम केले तर सुपर व्हिजन कुणी केले? टेंडर कागदावर दाखवून काम न करताच बिल काढण्यात येणार असल्याचा संशय आहे. याची तक्रार करून चौकशीची मागणी करणार आहे.
- संजय झाडे, सदस्य, शिवसेना, जि.प.
कंत्राटदाराने नाकारले काम
भंडारबोडीतच एका कामासाठी टेंडर काढण्यात आली. तीन कंत्राटदारांनी टेंडरमध्ये भाग घेतला. एकाने १० टक्के बिलोने (कमी दराने) टेंडर भरले. परंतु नंतर संबंधित कंत्राटदाराने काम करण्यास असमर्थता दर्शविला. त्यासाठी त्याच्यावर दबाव टाकण्यात आल्याची चर्चा आहे. कंत्राटदाराने काम नकार दिल्याने नव्याने टेंडर काढणे आवश्यक होते. परंतु विभागने अधिकच्या दराने टेंडर भरणाऱ्यास काम दिले. यामुळे जिल्हा परिषदेचा आर्थिक नुकसान झाले. याचीही चौकशी करण्याची मागणी झाडे यांनी केली.