नागपूर (Nagpur) : ग्रामीण भागातील प्रश्न, समस्या सोडविण्याचे आश्वासन नागरिकांना देऊन जिल्हा परिषदेत (ZP) आलेल्या काही सदस्यांनी कंत्राटदारासाठी (Contractor) 'फिल्डिंग' लावली आहे. रद्द झालेल्या कामांना त्यांनी लक्ष्य केले असून, नवीन कामासाठीही धडपड सुरू केल्याची जोरदार चर्चा आहे.
जिल्हा परिषदेत कॉंग्रेसची एकहाती सत्ता असून सुनील केदार (Sunil Kedar) गटाचे वर्चस्व आहे. पाचही पदाधिकारी त्यांचेच समर्थक आहेत. पहिल्यापेक्षा दुसऱ्या रेझिममध्ये एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण होत असल्याचे चर्चा आहे.
यात कामे महत्त्वाचा मुद्दा आहे. कामे मिळण्यासाठी एकमेकांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचे काम होत आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांच्या काळातील टेंडर रद्द करण्याचा प्रकार हा त्यातीलच एक भाग असल्याचे सांगण्यात येते. काही सदस्यांना काम हवे असल्याने दुसऱ्याच्या माध्यमातून त्या रद्द करून घेण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे.
बांधकाम विभागातील एक कर्मचाऱ्याचाही हात असल्याचे सांगण्यात येते. यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत राजकारण चांगलेच तापले होते. सत्ताधाऱ्यांमध्येच कुरघोडीचे राजकारण सुरू झाल्याचे दिसून आहे. आता हे काम आपल्या माणसाला मिळविण्यासाठी सदस्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. बांधकाम विभागातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरण्यात येत असल्याचीही चर्चा होत आहे. काही सदस्यांनी कामेही मिळवून दिली.
समाजाचे कल्याण करण्याच्या नावाने एका माजी पदाधिकाऱ्यांच्या धन्याने कंत्राटही नातेवाईकाच्या नावे मिळविली. पद जाण्यापूर्वीच कामासाठी आगावू रक्कमही काहींना दिल्याची चर्चा आहे. सर्वच विभागात हा प्रकार होत असल्याने अधिकारीही वैतागलेत. एका माजी महिला पदाधिकारी अद्यापही जुन्यात कामात आहेत. मर्जीतील व्यक्तीस कंत्राट मिळवून देण्यासाठी काही सदस्यांची मोठी धडपड सुरू आहे. त्यासाठी काही पदाधिकाऱ्यांनाही हाताशी धरण्याचे प्रयत्न आहे. पदाधिकाऱ्यांची सदस्यांना साथ मिळते की नाही, याकडेच अधिकाऱ्यांचे लक्ष आहे.