नागपूर (Nagpur) : मेयो आणि मेडिकलसह डागा स्त्री रुग्णालय असलेल्या नागपुरात 100 खाटांचे जिल्हा रुग्णालय उभारण्यात येत आहे. पाच वर्षांपूर्वी बांधकामाला सुरुवात झाली. मंजूर निधी खर्च झाला. खर्च 18 कोटींनी वाढल्याने बांधकाम रखडले. वर्षभरानंतर 18 कोटींच्या निधीला मान्यता मिळाली. मात्र, अद्याप काम सुरू झाले नाही. यासाठी नुकतेच तब्बल 4 कोटी जीएसटी भरावा लागला. निदान 2024 मध्ये जिल्हा रुग्णालय रुग्णसेवेसाठी सज्ज होईल का, असा प्रश्न विचारला जात आहे.
प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी जिल्हा रुग्णालय स्थापन करण्याची घोषणा 2013 मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारने केली. मात्र, यानंतर 2015 मध्ये राज्यात सत्ताबदल झाला. भाजप-सेनेच्या सरकारमध्ये तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी जिल्हा मुख्यालयी जिल्हा रुग्णालय उभारण्याची घोषणा केली. नागपूर जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी लागणाऱ्या 28 कोटी 5 लाखांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली. 100 खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या कामाचे 2016 मध्ये मनोरुग्णालयाच्या 8.9 एकर जागेवर बांधकामाचे भूमिपूजन झाले.
2018 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. 2020 मध्ये कोरोना आला आणि बांधकामाचा अर्धवट सांगाडा तेवढा तयार झाला. या काळात बांधकामाचा खर्च 18 कोटींनी वाढला. वाढीव निधी मिळाला नसल्याने कंत्राटदारांनी बांधकाम थांबवले. वाढीव 18 कोटींच्या निधीच्या प्रस्तावाला नुकतेच राज्य शासनाने मान्यता दिली.
मनुष्यबळाला मान्यता नाही
एक्स रे, सीटी स्कॅनपासून तर एमआरआय निदानाची सोय उपलब्ध करून देण्यात येईल. यामुळे मेयो, मेडिकलवर असलेला रुग्णसेवेचा भार मोठ्या प्रमाणात कमी होईल, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना, गरिबांना सार्वजनिक आरोग्यसेवेचा आधार आहे. नागपुरातील जिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक 220 प्रथम ते चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. अद्याप हा प्रस्ताव थंडबस्त्यात आहे.
2018 मध्ये प्रादेशिक मनोरुग्णालयातील जागेवर थेट कामाला सुरुवात करण्यात आली. 18 कोटीला प्रशासकीय मान्यता मिळाली. लवकरच फर्निचर, विद्युत यंत्रणा उभारण्याच्या कामाला वेग येणार आहे. आगामी सहा महिन्यांत बांधकाम पूर्ण व्हावे. मनुष्यबळाच्या प्रस्तावालाही लवकरच मान्यता मिळेल, अशी माहिती डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, नागपूर यांनी दिली.