नागपूर (Nagpur) : नागपुरात पूरस्थितीला ड्रेनेज सिस्टीम जबाबदार असल्याचे सांगत आता संपूर्ण शहरातील ड्रेनेज सिस्टीम सुधारण्याचे काम केले जाणार असल्याची माहिती नागपूर मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
जायका कंपनी सोबत मनपाचा करार झाला आहे. हा करार कमीत कमी 2 हजार कोटींचा आहे. यात 60 ते 65 टक्के निधी केंद्र सरकार देणार तर 25 टक्के निधी नागपूर मनपा खर्च करणार आहे. उर्वरित निधी राज्य सरकार देणार असल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले. जायका प्रोजेक्टमुळे शहरातील उत्तर आणि मध्य नागपूरात मलनि:स्सारण वाहिन्यांमध्ये अमुलाग्र बदल केले जातील, असे ते म्हणाले.
मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, जायका प्रोजेक्ट अंतर्गत पाच पॅकेजेस् बनवून शहराचा सर्व्हे केला जाणार आहे. पाच पॅकेजेस् मध्ये टेंडर दिले जातील. सोबतच त्यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधी एक पॅकेजचे टेंडर काढले जाईल.
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मनपाच्या हॉट मिक्स प्लान्टची संख्या 5 झाली असून दोन झोन मागे एक प्लान्ट काम करीत आहे. जिथे ड्रेनेज सिस्टीम नाही तिथे अमृत 2.0 योजने अंतर्गत लवकरच काम केले जाईल. नागपुरात फक्त मनपाच्या रस्त्यांशिवाय, एनएचएआय, सार्वजनिक बांधकाम विभाग व नागपूर सुधार प्रन्यासचे देखील रस्ते असून त्या रस्त्यावरील खड्ड्यांसाठी देखील मनपाला दोषी धरल्या जात असल्याचे ते म्हणाले.
नागपूर मनपाने शहरात 2 कोटी खर्च करून स्टीलचे डस्टबिन लावले होते. ओला आणि कोरडा कचरा टाकण्यासाठी अनेक परिसरात दोन-दोन डस्टबीन लावण्यात आले होते. परंतु काही ठिकाणी हे डस्टबीन चोरीला गेले तर काही डस्टबीन्स जंग लागून खराब झाले, तूटले आहेत. त्यामुळे अनेक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या खराब झालेल्या डस्टबिन्सची दुरुस्ती करण्याची माहिती सुद्धा मनपा आयुक्त डॉ. चौधरी यांनी दिली.