नागपूर (Nagpur) : अंबाझरीच्या पायथ्याशी असलेल्या नाग नदीचा नाला करण्यात आल्याने पश्चिम नागपूरमधील वस्त्या प्रथमच पावसाच्या पाण्याखाली बुडाल्या. याला नागपूर सुधार प्रन्यासचे (NIT) भ्रष्ट अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्याकडूनच नुकसानभरपाई वसूल करण्यात यावी, अशी मागणी पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे (Vikas Thackeray) यांनी केली.
तर विकासाचे नागपूर मॉडेल पावसाने फेल केले आहे. शहरातील सर्वच रस्ते सरसकट काँकिटचे करण्याचा आग्रह कोणाचा होता, त्याची उंची कोणी वाढवली, अशा शब्दांत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यावर निशाणा साधला.
ही भिंत तुटण्याचा धोका...
नागपूर महापालिकेच्यावतीने ओव्हर फ्लो पॉइंटवर स्वामी विवेकानंद यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याचे सौंदर्य वाढवण्यावासाठी मागच्या बाजूला भिंत बांधण्यात आली आहे. या भिंतीवर रोज पाणी येऊन आदळते. एखाद्या दिवशी ही भिंत तुटल्याशिवाय राहणार नाही असा धोकाही विकास ठाकरे यांनी व्यक्त केला. या बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी त्यांनी केली.
केबिनमध्ये बसून सफाई
वर्षभरापासून महापालिकेत प्रशासक आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. कोणीच विचारणा नसल्याने अधिकाऱ्यांनी यंदा फक्त केबिनमध्ये बसून नदी नाल्यांची सफाई केली. त्याचे परिणाम लोकांना भोगावे लागले असे ठाकरे यांनी सांगितले.
भविष्यात शहराला जलमय होण्यापासून रोखण्यासाठी अंबाझरी तलावाच्या पायथ्याशी नाग नदीचा पूल रुंद आणि उंच करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात शहराला मोठा धाका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर याच पुलाखाली असलेल्या नाग नदीतून प्रवाहित होते. आता नदी पात्र पूर्वीच्या तुलनेत अरुंद झाले. अनेक ठिकाणी प्रवाहाला अडथळे निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास तसेच अंबाझरी ओव्हर फ्लो झाल्यानंतर हे पाणी नाग नदीऐवजी शेजारच्या वस्त्यांमध्ये शिरते. याची प्रतीची आता सर्वांना आली आहे.
पूल अरुंद तसेच पुढे नदीचा प्रवाह रोखल्याने पुलाची भिंत तुटली. पाणी रस्त्यावर आले, नागरिकांच्या घरात शिरल्यावर पुलावर लोखंडी रेलिंग असती तर प्रवाहाला फायदा झाला असता. त्यामुळे भविष्यात हा धोका टाळण्यासाठी येथील पूल रुंद व उंच करणे गरजेचे आहे.
शिवाय नदी पात्र काही ठिकाणी अरुंद झाले आहे. नदी पाण्याची प्रवाह सुरळीत करण्यासाठी हे पात्र पूर्वीप्रमाणे मोठे करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. अंबाझारी तलाव अनेक वर्षे जुना आहे. तलावाची मातीची सुरक्षा भिंत खचत चालली आहे. पाण्याच्या प्रवाहात भिंतीची माती वाहत चालली आहे, असे ठाकरे म्हणाले.
स्ट्रक्चरल ऑडिट करा
17 वर्षांपासून नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. नाग नदीचे खोलीकरण झाली नाही. उलट काठावर पालिकेने बांधकामाच्या परवानग्या दिल्या आहेत. दुसरीकडे रस्त्यांची उंची वाढवली. यापूर्वी अनेकदा अतिवृष्टी झाली. मात्र नागपूर पाण्याखाली आले नाही. मात्र भाजपने विकासाच्या नावावर जी लूट माजवली त्याचे दुष्परिणाम आता दिसत आहेत.
विवेकानंद स्मारकाच्या बांधकामाची चौकशी व्हायला पाहिजे. या स्मारकाचे सोशल आणि स्ट्रक्चरल ऑडिट केले पाहिजे. नागपूरची ग्रीन सिटी ओळख पुसण्याचे काम भाजपने केले असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
विकासाचे नागपूर मॉडेल पावसाने फेल केले आहे. शहरातील सर्वच रस्ते सरसकट काँकिटचे करण्याचा आग्रह कोणाचा होता, त्याची उंची कोणी वाढवली, अशा शब्दांत पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला.
आता कशामुळे शहर जलयम झाले याचा दिखावा करण्यापेक्षा सर्वांना संपूर्ण नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी पटोले यांनी केली.