चंद्रपूर (Chandrapur) : नागभीड-ब्रम्हपुरी - आरमोरी 353 डी या राष्ट्रीय महामार्गाचे काम चार वर्षांपूर्वीच पूर्ण झाले. नागपूर - उमरेड हा राष्ट्रीय महामार्गसुद्धा पूर्ण झाला. मात्र याच मालिकेतील नागभीड- उमरेड या राष्ट्रीय मार्गाचे "बाळंतपण" कुठे अडले आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नागभीड-उमरेड या राष्ट्रीय महामार्गाचे काम अडून असल्याने हजारो प्रवाशांना रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
गडचिरोली, वडसा, कुरखेडा आरमोरी, ब्रह्मपुरी, मूल, सिंदेवाही, तळोधी आणि नागभीड या शहरांतील नागरिकांना विविध कामांसाठी नेहमीच नागपूर या उपराजधानीच्या ठिकाणी जाणे-येणे करावे लागते. आठ-दहा वर्षांपूर्वी या शहरातून नागपूरला जोडणाऱ्या या मार्गाची अवस्था अतिशय विकट होती. ही अवस्था लक्षात घेऊन या मार्गास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला व नागपूरपासून उमरेडपर्यंत आणि आरमोरीपासून नागभीडपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाचे कामही पूर्ण करण्यात आले.
मात्र नागभीडपासून उमरेडपर्यंतच्या कामास अद्यापही मुहूर्त साधण्यात नाही. मुहूर्त का साधण्यात आला नाही, याचे कारणही गुलदस्त्यात आहे. या मार्गाने आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते, मंत्रालयातील सचिव पातळीवरील अधिकारी नेहमीच प्रवास करतात; पण त्यांच्याही मनात या महामार्गाचे 'बाळंतपण' कुठे अडले आहे, असा प्रश्न निर्माण होऊ नये याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या महामार्गाने संपूर्ण गडचिरोली जिल्हा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी, नागभीड, मूल, सिंदेवाही, तळोधी येथील नागरिक हजारो वाहनांनी या मार्गाने रोज प्रवास करत आहेत. मात्र या वाहनांना हा मार्ग तोकडा पडत आहे.
अनेक अपघात या मार्गावर घडत असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वाहनचालक या मार्गाने कशी वाहने चालवतात हे त्यांनाच ठाऊक आहे.
नवखळा ते ब्राह्मणी अतिशय धोकादायक :
या महामार्गावरील नवखळा ते बाह्मणी हा तीन किलोमीटरचा रस्ता तर अतिशय धोकादायक आहे. या तीन किलोमीटरची रुंदी, तर जिल्हा महामार्गासारखीच आहे, असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. या ठिकाणी आजवर अनेक अपघात आले आहेत. अनेक निष्पाप लोकांचा या अपघातात बळी गेला आहे. आधीच रस्त्याची रुंदी कमी, त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठी झाडे, वामुळे हा तीन किलोमीटरचा प्रवास जीव मुठीत घेऊनच करावा लागत आहे.