नागपूर (Nagpur) : काटोल-नागपूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. कामाची गती संथ असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातही, या मार्गावरील मेंढेपठार ते चारगाव या 14 किमी रस्त्याच्या हस्तांतरणात केंद्रीय वन्यजीव विभागाने खोडा निर्माण केला आहे. त्यामुळे, या रस्त्याच्या कामाला अजूनही हात लागलेला नाही.
या रस्त्याची अवस्था भयावह असून, अनेक दुचाकीचालक पडून जखमी झाले आहेत. या 14 किमी रस्त्याचे डांबरीकरण कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्य शासनाने याची दखल घेण्याची मागणी नागरिक करत आहेत.
48.2 किमी काटोल-नागपूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन तीन वर्षांपूर्वी करण्यात आले. टप्याटप्प्यात या रस्त्याचे कामही होत आहे. मात्र, याच रस्त्यावरील मेंढेपठार ते चारगाव या 14 किमी अंतराच्या रस्त्याचे काम अद्यापही सुरु झाले नाही.
माहिती घेतली असता, या भागात असलेल्या जंगलामुळे केंद्रीय वन्यजीव विभागाने या भागात परवानगी दिलेली नाही. परिणामी काम सुरू झालेले नाही. या रोडवर ट्रक व इतर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे, हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. दुचाकी चालकाला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अनेक छोटे मोठे अपघातही झाले आहेत. त्यामुळे, या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालून कोणता मोठा अपघात होण्याअगोदर डांबरीकरणाचे प्रयत्न करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
काटोल-नागपूर महामार्ग अतिशय वर्दळीचा असून, खासगी वाहनांसोबतच अवजड वाहने धावत असतात, रुग्णवाहिकाही धावत असतात. तीन वर्षांपासून या रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे, कामाची गती वाढवणे गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिक नागरिक रुपेश नाखले यांनी केली आहे.