मुंबई (Mumbai) : नागपुरातील अंबाझरी भागात प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभवनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेत झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी प्रदान केल्यानंतर त्याच्या प्रशासकीय मान्यतेचा आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे.
यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून सार्वजनिक बांधकाम विभाग हे काम करणार आहे. या भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भवन उभारण्यात यावे, अशी मागणी आंबेडकरी समुदायातर्फे करण्यात आली होती.
जुने आंबेडकर भवन पुनर्विकासात तोडण्यात आल्याने एक मोठा रोष होता. त्यामुळे या प्रकल्पावर स्थगिती देण्यात आली होती.
दरम्यानच्या काळात काही आंदोलनेही करण्यात आली होती. शासनाच्या वतीने या समाजभवनाचे पुन्हा काम करावे, अशी मागणी सुद्धा करण्यात आली होती. त्याला प्रतिसाद देत आणि समाजाच्या भावना लक्षात घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियोजन समितीच्या बैठकीत त्यासंदर्भातील निर्देश दिले होते. त्यानुसार, काल यासंदर्भातील प्रशासकीय मंजुरीचा आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. आता शासन हे बांधकाम करेल, असे म्हटले आहे.