चंद्रपूर (Chandrapur) : नागभीड ते नागपूर (इतवारी) हा 106 किलोमीटर नॅरोगेज रेल्वेमार्गाचे 20 महिन्यात ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट होते. पण तीन वर्षांनंतर केवळ 50 टक्केच होऊ शकले. 1400 कोटी असलेल्या मूळ प्रकल्पाची किंमत आता सुमारे 1700 कोटींवर पोहोचली. त्यामुळे रेल्वे मार्गाच्या पूर्णत्वासाठी आणखी किती वर्षे लागणार, असा प्रश्न नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी तालुक्यातील नागरिक विचारत आहेत.
नागभीड ते नागपूर (इतवारी) हा मार्ग 24 नोव्हेंबर 2019 रोजी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालय खर्चाचा प्रत्येकी 50 टक्के वाटा उचलून या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्याचे काम सुरू आहे. काम पूर्ण झाले तर पूर्व विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, भंडारा जिल्ह्याला लाभ होणार आहे. प्रवासी तसेच मालवाहतुकीत वाढ होईल. याशिवाय नागपूर, कळमना, इतवारी, अजनी व वर्धा रेल्वेमार्गावरील वाहतूक कोंडी टाळता येणार आहे, असेही तेथील नागरिकांचे म्हणणे आहे. या मार्गावरून कोळशाची वाहतूक इतवारी-नागभीड मार्गावरून होऊ शकेल. परिणामी, कोळसा खाणीपासून वीजनिर्मिती केंद्रापर्यंत कोळसा नेण्याच्या वेळेत बचत होईल. या रेल्वेमार्गाचा फायदा कोराडी, खापरखेडा, एनटीपीसी (मौदा) आणि अदाणी (तिरोडा) औष्णिक प्रकल्पाला होऊ शकतो. मात्र, ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्यास बराच विलंब झाला आहे. महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर श्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (महारेल) या प्रकल्पाचे काम करीत आहे.
1908 मध्ये सुरू झाली नॅरोगेज रेल्वे :
नागपूर-नागभीड नॅरोगेज रेल्वेची अखेरची फेरी 25 नोव्हेंबर 2019 रोजी सोडण्यात आली. रेल्वे प्रशासनाने शेवटच्या गाडीला भावपूर्ण निरोप दिला. ब्रिटिश काळापासून सुरू असलेली नॅरोगेज रेल्वे इति- हासजमा झाली. इतवारी-नागभीड दरम्यान 9 नोव्हेंबर 1908 पासून नॅरोगेज रेल्वे वाहतूक सुरू होती. 58847 क्रमांकासह धावलेल्या अखेरच्या इतवारी- नागभीड नॅरोगेज रेल्वेला फुलमाळा, फुगे, तोरण, माळा, पाना-फुलांनी सजविले होते. स्थानकावर सायंकाळी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय, वीरेंद्र कोहळे यांनी हिरवी झेंडा दाखवून गाडीला रवाना केले होते.
एक अडथळा संपला पण...
उमरेड-पवनी-करांडला अभयारण्यातून जात असलेल्या या रेल्वेमार्गाला वन्यजीव भ्रमणमार्गाने अडथळा निर्माण झाला. नागपूर ते उमरेड पर्यंतचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु, उमरेड ते नागभीड या दरम्यानचे काम ठप्प आहे. यापैकी 26 किलोमीटरचा रेल्वेमार्ग उमरेड- पवनी-करांडला अभयारण्यातून जात आहे. त्यामुळे या रेल्वेमार्गाच्या मान्यतेसाठी प्रारंभी राज्य वन्यजीव मंडळ व भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून यांच्या कसोटीतून जावे लागले. याबाबत राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने परवानगी दिली नव्हती. उमरेड ते नागभीड 56 किलोमीटरचे काम जुलै-ऑगस्ट 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. पण कामाची गती पाहिल्यास बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे.
ब्रॉडगेजचा फायदा कुणाला?
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, गडचिरोली - जिल्ह्यातील वडसा, कुरखेडा, आरमोरी, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यातील पवनी, लाखांदूर या तालुक्यांना नागपूरसाठी सोयीचे होईल.