नागपूर (Nagpur) : नागपूर महापालिकेचा (NMC) उद्यान विभाग G-20 पासून जास्त चर्चेत आला आहे. G-0 आंतराष्ट्रीय परिषदेसाठी शहराला सुंदर करण्यासाठी चक्क 40 कोटी खर्च करण्यात आले. आता नागपूरच्या गोरेवाडा येथे 5 एकर जागेवर नर्सरी तयार करण्यात येणार आहे. यासाठी ईस्टीमेट तयार झाले असून, लवकरच काम सुरू केले जाणार आहे.
नर्सरी बनविण्यासाठी गोरेवाडा रस्त्याच्या डावीकडे जागा दिलेली आहे. या नर्सरी मध्ये जास्तीत जास्त औषधी वनस्पती लावल्या जाणार आहेत. ज्याचा फायदापुढील वर्षात होणार आहे. यावर सुद्धा महापालीकेतर्फे भरघोस निधी खर्च करण्यात येणार आहे.
एकीकडे शहरात G-20 आंतराष्ट्रीय बैठकीच्या नावावर संपूर्ण शहरात 2 लाखांहून अधिक रोपांची खरेदी आणि लागवड करण्यात आली होती. आकर्षक ताडाच्या झाडांना विदर्भातील आर्द्रता आणि उन्हाचा तडाखा सहन होत नव्हता. तसेच अजनी चौक, नरेंद्र नगर, वर्धा रोडसह अनेक भागातील रस्ता दुभाजकांवर आकर्षक झाडे, फुले उन्मळून पडली आहेत.
अनेक ठिकाणी काळजीच्या नावाखाली कोरड्या झाडांना पाणी दिले जात आहे. कंत्राटी एजन्सीला देखभालीची जबाबदारी देण्यात आल्याचा दावा उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केला जात असला तरी कोणतीही व्यवस्था नाही. मात्र, अवघ्या आठवडाभरापूर्वी लावलेली रोपटी व झाडांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे हिरवळीवर खर्च केलेले तब्बल 40 कोटी पाण्यात गेल्याचे सामान्य नागरिक म्हणत आहेत.
रोज गार्डनचे काम पूर्ण
64 हजार खर्च करून रोज गार्डन तयार करण्यात आले आहे. तसेच वंदे मातरम उद्यान आणि मेजर सुरेंद्र देव पार्क येथे बेस्ट आउट ऑफ वेस्ट उद्यानाचे काम सुरू आहे. सोबतच सिव्हिल ऑफिस उद्यानाचे सौंदर्यीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. लकडगंज येथे कैक्टस उद्यान आयुर्वेदीय व वेलवर्गीय थीम वर नवीन उद्यान तयार केले जाणार आहे. या सर्व उद्यानांच्या देखभालीचे टेंडर देण्यात काढण्यात आले आहे.
मानेवाडा, कळमना, पारडी, हिंगणा एमआईडीसी लगत मोकळ्या जागेवर, रस्ता दुभाजकामध्ये हिरवळ, वृक्ष रोपण व घाटावर मियावाकी पध्दतीने वृक्ष लागवड करणे, पी.के.वी.च्या प्राप्त जमीनीवर ब्लॉक प्लांटेशन करणे, मियावाकी पध्दतीने भांडेवाडी व स्नेह नगर येथे वृक्ष लागवड करणे, सी. एस. आर. फंड मधून वायुसेना याच्या वर्धा रोड व अमरावती रोड वरील जागेवर 10000 वृक्षांचे ब्लॉक प्लांटेशन करण्याचे लक्ष महापालिकेच्या उद्यान विभागाचे आहे.
उद्यान विभागात मागील 12 वर्षांपासून कर्मचाऱ्यांची कमतरता होती. याकरीता टेंडर काढून 4 उद्यान पर्यावेक्षक व 19 सहायक माळीची कंत्राटी पध्दतीने नेमणूक करण्यात आली आहे. ज्यामुळे प्रलंबित झाडांच्या व उद्यानांच्या तक्रारीचा जलद गतीने निपटारा होत आहे. तरीसुद्धा उन्हाळ्यात कोट्यवधी खर्च करून लावलेल्या झाडांची देखभाल कशी होते हे झाडांची स्थिति पाहून दिसून येत आहे.