नागपूर (Nagpur) : जगप्रसिद्ध दीक्षाभूमीच्या (Deeksha Bhumi) सुशोभिकरण आणि विकासासाठी 200 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यासाठी टेंडरही (Tender) काढण्यात आली आहेत. 14 ऑक्टोबर रोजी विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे. येत्या दोन वर्षांनी दीक्षाभूमीला नवे रूप मिळेल, असा विश्वास एनआयटीचे (NIT) अध्यक्ष मनोजकुमार सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.
धम्मचक्र प्रवर्तन दिनी देश-विदेशातून बौद्ध अनुयायी येतात आणि वर्षभरात देश-विदेशातून लाखो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीला भेट देत असतात. दीक्षाभूमीचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य सरकारने याला अ-श्रेणीच्या पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची जबाबदारी एनआयटीकडे देण्यात आली आहे. एनआयटीने नोएडाच्या डिझाइन असोसिएटकडून विकासात्मक आराखडा तयार केला आहे.
असा होणार बदल...
धम्मचक्र प्रवर्तन दिनी होणाऱ्या कार्यक्रमासाठी मोठा स्टेज बांधण्यात येणार आहे. सध्याच्या पार्किंगच्या जागी भूमिगत पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. 400 कार, एक हजार दुचाकी आणि एक हजार सायकलसाठी पार्किंगची सुविधा असेल.
मुख्य स्तुपाच्या प्रवेशद्वाराचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. प्रवेशद्वाराची रुंदी वाढेल. स्तुपाभोवती प्रदक्षिणा मार्ग तयार केला जाईल. त्याच्या शेजारी एक खुला हॉल असेल. संपूर्ण परिसर फुलांच्या झाडांनी आणि हिरवाईने व्यापलेला असेल. त्यासाठी दीक्षाभूमीची 22.80 एकर जमीन वापरण्यात येणार आहे. परिक्रमा मार्गासाठी केंद्रीय कापूस सुधार संस्थेची 3.84 एकर जमीन दीक्षाभूमीजवळ घेतली जाणार आहे.
200 कोटी रुपये खर्चून सुशोभीकरण व विकास कामे करण्यात येणार आहेत. राज्य सरकारने 40 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. 14 ऑक्टोबर रोजी विकासकामांचे भूमिपूजन केले जाणार आहे.