नागपूर (Nagpur) : नागपूर शहरात जगोजागी बांधकामे सुरू आहेत. बांधकाम सुरू असलेल्या उडाणपुलावर एकाचा मृत्यू झाला आहे. 4 जण जखमी झाले आहेत, सिमेंट रस्त्यावर 6 जणांना आपला जीव गमवावा लागला असून, 25 जण जखमी झाले आहेत. या वर्षभरात आतापर्यंत अपघातांत 228 जणांचा जीव गेला आहे. गेल्यावर्षी ही संख्या 138 होती. दिवसेंदिवस हा आकडा वाढतच चालला आहे. याची गंभीर दखल घेत नागपूर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी ठेकेदार आणि बांधकाम कंपनी मालकांना इशारा दिला आहे.
पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी उड्डाणपूल तसेच सिमेंट रस्त्याच्या बांधकामादरम्यान होणाऱ्या जीवघेण्या अपघातांची गंभीर दखल घेत अल्टिमेटमच दिला आहे. कामात हलगर्जी करून जनतेच्या जीवाला धोका निर्माण करणारे कंत्राटदार, बांधकाम कंपन्यांचे मालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांनी सर्व पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या परिसरात सुरू असलेल्या बांधकामांचे ऑडिट करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
काम थांबले तर कुणीही बोलणार नाही, बघणार नाही ही वृत्ती खपवून घेतली जाणार नाही. परवानगीशिवाय कोणतेही काम केले जाणार नाही. काम सुरू करण्यासाठी प्रथम पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी लागेल. बेरिकेड्स, ब्लिंकर, सुरक्षारक्षक अनिवार्य असतील, बांधकाम सुरू होण्यापूर्वी 100 फूट अंतरावर फलक लावून नागरिकांना सावध करावे लागेल. रात्री उजेडाची व्यवस्था करण्याची जबाबदारीही ठेकेदाराची आहे.
पोलिसांच्या परवानगीशिवाय कोणीही रस्ता बंद करणार नाही, कंपनीचे नाव आणि जबाबदार अधिकाऱ्याचा मोबाइल क्रमांकही बांधकामाच्या ठिकाणी नमूद करावा लागणार आहे. एखाद्याचा जीव गेल्यावर केवळ नावापुरता गुन्हा दाखल होणार नाही, अशा प्रकरणांत थेट कंपनीचे मालक व कंत्राटदारांनाच आरोपी करण्यात येईल, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरचे खासदार आहेत आणि केंद्र सरकारमध्ये रस्ते परिवहन मंत्री सुद्धा आहे. नागपूर शहरात 20 फ्लाईओव्हर आणि 24 सिमेंट रोडचे काम सुरू आहे. नागपूर पोलिस आता ऍक्शन मोड वर आले आहेत. कारण मागील वर्षी 138 लोकांचा खड्यामुळे झालेल्या अपघातात जीव गेला होता, तर यावर्षी हा आकडा वाढला असून ऑगस्ट महिन्यापर्यंत 228 लोकांना आपला जीव गमावला लागला आहे.