नागपूर (Nagpur) : नागपूर रेल्वे स्थानकाला (Nagpur Railway Station) अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी रेल भूमी विकास प्राधिकरणाने (RLDA) जवळपास ५३६ कोटी रुपयांचा खर्चाचा आराखडा तयार केला आहे. यात मल्टी मॉडेल इंटिग्रेशन रेल्वेस्थानक,
मल्टी-लेव्हल कार पार्किंग, स्कायवॉक, डिपार्चर हॉलला जोडणारा रूफ प्लाझा, कॉमन वेटिंग एरिया, ग्रीन बिल्डिंग आदींचा समावेश आहे.
नागपूर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी नुकतीच आरएलडीएने एक बैठक घेतली होती. स्थानकाचे अतिशय चांगले डिझाईन (स्ट्रक्चर) आणि उत्कृष्ट बांधकाम करणाऱ्याला हे काम दिले जाणार आहे. बैठकीला कंत्राटदार व बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते. प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा पुरविणे याबाबतीत मुख्य विचार होणार आहे. पुढील बैठक जुलै महिन्याच्या २८ तारखेला होणार आहे. त्यानंतर कामाचे वाटप होऊन उत्तम काम करणाऱ्याची निवड केली जाणार आहे. सध्या ५३६ कोटींची टेंडर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. या अपग्रेडेशनचा मुख्य उद्देश प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा पुरविणे हा आहे.
स्थानकाच्या पुनर्विकासाच्या या कामामध्ये मल्टी मॉडेल इंटिग्रेशन रेल्वेस्थानक, मेट्रो स्थानक आणि मल्टी-लेव्हल कार पार्किंगला जोडणाऱ्या स्कायवॉकच्या माध्यमातून काम होणार आहे. त्याचप्रमाणे स्टेशनच्या पूर्व आणि पश्चिम भागात डिपार्चर हॉलला जोडणारा एक रूफ प्लाझा बांधण्यात येईल. यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक कॉमन वेटिंग एरिया प्लॅटफार्मच्या वरच्या बाजूला असेल. त्यामुळे प्रवाशांना जाण्यासाठी अडचण होणार नाही. स्थानकाच्या विकासाचे हे मॉडेल भारतीय प्रवाशांना जागतिक स्तरावरील प्रवासाचा अनुभव देणारे ठरेल.
दिव्यांग प्रवाशांच्या सोयींसोबतच ग्रीन बिल्डिंगच्या स्वरूपात विकासाचे डिझाईन केले जाईल. नागपूर रेल्वेस्थानक हावडा-मुंबई आणि दिल्ली-चेन्नई ट्रंक लाइनवर महत्त्वपूर्ण जंक्शन आहे. या स्टेशनला एनएसजी- २ श्रेणी प्रदान करण्यात आली आहे. नागपूर हे भारतीय रेल्वेतील मोजक्या शंभर स्थानकांपैकी तसेच महाराष्ट्रातील सर्वांत जुने आणि व्यस्त स्थानकांपैकी एक आहे. आरएलडीए रेल्वे मंत्रालयातर्गत वैधानिक प्राधिकरण आहे. यात स्टेशनचा पुनर्विकास, नवीन योजना, रेल्वे कॉलनीचा विकास, नवीन बांधकाम आदी कामे या अंतर्गत केली जाणार आहेत.