नागपूर (Nagpur) : मुख्य रेल्वे स्थानक जागतिक दर्जाचे करण्यासाठी ३६ महिन्यांचे उद्दिष्ट ठेवून काम सुरू करण्यात आले. २४ महिन्यांचा कालावधी लोटूनही केवळ ३५ टक्केच काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे ‘वर्ल्ड क्लास स्टेशन’चे काम ‘लोकल’च्या गतीने सुरू असल्याचे वास्तव आहे. मुख्य प्रवेशद्वारासमोरील पार्किंगचा परिसर खोदण्यात आल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम ४८७.७७ कोटी रुपये खर्चून केले जात आहे. रेल लँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटी(आरएलडीए) अंतर्गत सुरू असलेले काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला आहे. टेंडर प्रक्रिया मंजूर होऊन कामाला डिसेंबर २०२२ मध्ये सुरवात झाली. १७ ऑक्टोबर २०२२ रोजी मॅसर्स गिरधारी लाल कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीला काम देण्यात आले. मात्र, कामे अतिशय संथ गतीने सुरू असल्याने डिसेंबर २०२५ पर्यंतच्या मुदतीत स्थानक ‘वर्ल्ड क्लास’ होईल, याची शक्यता पूर्णपणे धूसर झाली आहे. रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पार्किंग परिसर खोदून टिनांनी बंदही करण्यात आला आहे. परिणामी पायी जाणाऱ्या प्रवाशांना ये-जा करताना मोठा त्रास होत आहे. त्याचबरोबर प्रवाशांना आणून सोडणाऱ्या वाहनांनीही मोठी कसरत करावी लागत असून आहे. सोबतच वाहतूक कोंडीचीही समस्या येथे निर्माण झाली आहे.
प्रशासकीय इमारतीचे काम २५ टक्के
आतापर्यंत प्रस्तावित कामांपैकी ईस्ट विंग बेसमेंटचे काम ७० टक्के झाल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे. त्याचबरोबर ईस्ट विंग आगमन ब्लॉकचे ५५ टक्के आणि ईस्ट विंग एक्झिट ब्लॉकचे ६५ टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पश्चिमेकडील बेसमेंट पार्किंगचे ४५ टक्के आणि प्रशासकीय इमारतीचे २५ टक्केच काम होऊ शकले आहे. अस्तित्वातील प्रवासी सुविधा स्थलांतरित केल्यानंतरच पश्चिम विंग आगमन ब्लॉक आणि एक्झिट ब्लॉकचे काम होणार आहे.
केवळ ३५ टक्के कामाची भौतिक प्रगती
याप्रकल्पातील कामांची ३५ टक्के भौतिक प्रगती साधली गेली आहे. उत्तरेकडील फूट ओव्हर ब्रिज (एफओबी), दक्षिणेकडील एफओबी आणि एअर कॉन्कोर्सचे ५ टक्के कामे झाली आहेत. हेरिटेज इमारतीचे काम सुरू झाले असून कॉनकोर्स पूर्ण झाल्यानंतर फलाट आणि छताचे नूतनीकरण सुरू होईल. तसेच स्थानकाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर प्रसारित क्षेत्र विकसित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ४८७.७७ कोटीच्या कामात आतापर्यंत केवळ १०१.४८ कोटीची कामे होऊ शकली आहे.