Nagpur News नागपूर : राज्य कामगार विमा महामंडळाने राज्यात नवीन 18 रुग्णालये स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर दहा रुग्णालयांसाठी जमीन संपादित करण्याचा हालचालींना वेग आला आहे. मात्र, सहा वर्षांपूर्वी नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात 200 बेडचे अत्याधुनिक कामगार विमा रुग्णालयाचे भूमिपूजन होऊनही अद्यापही हे रुग्णालय कागदावरच आहे. जुनीच प्रस्तावित रुग्णालये अजून उभी राहिली नाहीत तर नवे रुग्णालय उभे राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीने ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर येथील वैद्यकीय प्रशासन अधिकाऱ्यांच्या नावाने 5 जून रोजी एक पत्र काढले. यात संबंधित जिल्ह्यातील 'एमआयडीसी' विभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून प्रस्तावित 10 रुग्णालयांसाठी जमीन संपादित करून घेण्याकरिता पाठपुरावा करण्याचा सूचना केल्या. 200 बेडच्या रुग्णालयासाठी नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील पाच एकर जागा 2018 मध्येच राज्य कामगार विमा महामंडळाकडे हस्तांतरित झाली.
बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात जवळपास लाखो कामगार काम करतात. यातील सुमारे 40 हजारांवर विमाधारक (ईएसआयसी) योजनेत समाविष्ट आहेत. कामगार व कारखानदार मिळून दर महिन्याला जवळपास कोट्यवधी रुपये कामगार विम्याच्या माध्यमातून शासनाला मिळतात. परंतु, कामगारांना सोयी-सुविधा मिळत नसल्यामुळे कामगार व रोजगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी बुटीबोरी येथील या ईएसआयसी रुग्णालयाला मान्यता दिली. बांधकामासाठी 175 कोटी रुपयेही दिले. परंतु, संथ गतीच्या बांधकामामुळे रुग्णालय कधी रुग्णसेवेत सुरू होणार याची वाट सर्वांना आहे.
बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात शेकडो कंपन्या आहे. कंपनीत, रस्त्यावर कुठे ना कुठे अपघात होतात. कुटुंबात कोणी आजारी पडल्यास आणि तो गंभीर स्वरूपाचा असल्यास त्याला नागपुरातील सोमवारी पेठेतील राज्य कामगार विमा रुग्णालयात दाखल करावे लागते. परंतु, या रुग्णालयातील सोयी केवळ नावा पुरत्यात आहेत. म्हणून कामगार रुग्ण अडचणीत येतात. उपचारासाठी पैसे भरूनही उपचार मिळत नसल्याच्या कामगारांच्या अनेक तक्रारी आहेत.
ईएसआयसीच्या सब रिजनल ऑफिसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, डिसेंबर 2025 किंवा 2026 मध्ये बुटीबोरी येथील रुग्णालयचे बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या 15 टक्के काम झाले आहे.