नागपूर (Nagpur) : सहा महिन्यांपासून महापालिकेत वित्त अधिकारी नसल्याने महापालिकेतील कंत्राटदार चांगलेच वैतागले आहेत. त्यांची सुमारे ३०० कोटींची देयके अडकली आहेत. त्यामुळे आता काम बंद करण्याचा इशारा या ठेकेदारांनी महापालिकेला दिला आहे. (Nagpur Municipal Corporation News)
महापालिकेतील स्टेशनरी घोटाळा उघडकीस आल्यानंतर अनेक अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे. त्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. त्यातच ते सेवानिवृत्त सुद्धा झाले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अधिकारी व ठेकेदारांनी वित्त अधिकारी नेमावा अशी मागणी केली आहे. याकरिता ठेकेदारांनी नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मात्र सरकारच अस्थिर असल्याने अद्याप कोणाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
नागपूर महापालिकेचे बजेट सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे आहे. विकास कामावरील खर्चाची त्यात तरतूद करण्यात आली आहे. जी कामे पूर्ण झाली आहेत आणि कुठल्याही तांत्रिक अडचणी नाही, अशी देयके सक्षम अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने काढण्यास काय हरकत आहे, असा सवाल ठेकेदारांचा आहे. निव्वळ त्रास देण्यासाठी पैसे देण्यास टाळाटळ केली जात असल्याचे ठेकेदारांचे म्हणणे आहे.
कंत्राट काढताना अनेक शर्ती व अटी टाकल्या जातात. कामाचा कालावधी निश्चित केला जातो. विलंब झाल्यास दंड आकारला जातो. येथे मात्र काम वेळेत केल्यानंतरही देयके देण्यासाठी कुठलाही कालावधी निश्चित नाही. अधिकऱ्यांच्या मर्जीनुसार देयकडे काढली जातात. त्याकरिता प्रत्येकाला चिरीमिरी द्यावी लागते. तासन तास कार्यालयात बसून राहावे लागते. कामाचे पैसे घेण्यासाठीसुद्धा चकरा माराव्या लागत असल्याने ठेकेदार चांगलेच वैतागले आहेत.