नागपूर (Nagpur) : सोमवारी झालेल्या जोरदार पावसाने महापालिकेच्या रस्त्यांचे नियोजन पुन्हा एकदा फसले असल्याचे उघड झाले आहे. सिमेंट रोडच्या डीपीआरसाठी नामवंत सल्लागाराला कोट्यवधी रुपये मोजले होते. या डीपीआरमध्ये चौकांचा समावेशच करण्यात आला नसल्याने पाणी तुंबण्याची नवी समस्या शहरात निर्माण झाली आहे. याकरिता पुन्हा कोट्यवधी रुपयांचा खर्च महापालिकेला करावा लागणार आहे.
सोमवारी नागपूर झालेल्या अतिवृष्टीत पुन्हा डांबरी रस्ते वाहून गेले आहेत. त्यामुळे महापालिकेला पुन्हा डांबरीकरणासाठी सुमारे शंभर कोटी रुपयांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पावसाची पाणी वाहून नेण्यासाठी सर्व प्रमुख रस्यांवर ड्रेनेज तयार करण्याचे निर्देश दिले होते.
अलीकडे दोन तीन वर्षांपासून शहरात रस्त्यांवर पाणी साचण्याचा आणि घराघरात पावसाचे पाणी शिरण्याचा चांगलाच त्रास वाढला आहे. याला सिमेंटचे रस्ते आणि त्यांची वाढलेली उंची हे मुख्य कारण आहे. रस्ते उंच झाल्याने घरे खाली गेली आहेत. जोरदार पाऊस आल्यास रस्त्यांवरचे पाणी थेट घरांमध्ये शिरले. दुसरीकडे सिमेंटचे रस्ते करताना ड्रेनजची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर तुंबून राहाते. सिमेंटचे रस्त उंच असताना चौकांची जागा तशीच सोडून देण्यात आली. त्यामुळे शहरात बहुतांश चौक खोलात गेले आहेत. त्यात थोडाजरी पाऊस आला तरी गुडघाभर पाणी साचले जाते. महापालिकेने सिमेंटचे रस्ते करताना राठी असोसिएट्स या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. याच कंपनीने सिमेंट रोडच डीपीआर करून दिला होता. कंपनीनकेड नामवंत आर्किटेक असताना सिमेंट रोडच्या नियोजनातून चौका का सोडले असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कंपनी आता याची जबाबदारी घ्यायला तयार नाही. मात्र याचा आर्थिक फटका महापालिकेला बसणार आहे. खोलगट झालेल्या चौकात भराव टाकून सिमेंट रोडच्या समतोल करावे लागणार आहे. विशेष म्हणजे सिमेंट रोडचा डीपीआर तयार करण्यासाठी महापालिके राठी असोसिएट्सला ७० कोटी रुपये मोजले होते.