नागपूर (Nagpur) : कधी कचरावाला बुट्टी मारतो तर कधी खोटंं बोलून कचरा उचलल्याची नोंद केली जाते. अशा असंख्य तक्रारी महापालिकेत रोजच येतच असतात. त्यानंतर कधी कंत्राटदाराला दंड ठोठावला जातो, कारवाईचे इशारे दिले जातात, कंत्राट रद्द करण्याची धमकी दिली जाते. यामुळे वैतागलेल्या महापालिकेने आता कचरा संकलकांना क्यू आर कोड दिला आहे.
त्यानुसार शहरातील घराघरातून कचरा संकलन करताना कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड स्कॅन करून कचरा घ्यावा लागणार आहे. विशेष म्हणजे घरावर क्यूआर कोडचे स्टिकर लावण्यात येणार आहे. नागपूरमधील गांधीबाग झोनमधून हा पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे. महापालिकेने आतापर्यंत कचरा संकलन करणाऱ्या चार कंत्राटदारांना बदलले आहे. अलीकडेच एजी आणि बीव्हीजी या दोन कंत्राटदारांची चौकशी करण्यात आली. चौकशी समितीने संबंधित कंपन्यांचे कंत्राट रद्द करण्याची शिफारस आपल्या अहवालातून केली आहे. नियमितपणे कचरा उचलला जात नाही, महापालिकेचे पदाधिकारी व बड्या अधिकाऱ्यांनाच फक्त खुश ठेवले जाते, कचऱ्याचे वजन वाढवण्यासाठी त्यात माती भेसळ केली जाते व महापालिकेकडून अधिकचा पैसा उचलला जातो असे आरोप संबंधित कंपन्यांवर आहे. त्यावर आता क्यू आर कोडचा उपाय शोधण्यात आला.
शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलनाची व्यवस्था अधिक व्यापक आणि पारदर्शक करण्यासाठी क्यूआर कोड पद्धतीवर आधारित 'स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टिम'ची सुरुवात करण्यात आली आहे. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड व महानगरपालिकेकडून ‘आयसीटी’वर आधारित सिस्टिम लागू करण्यात आली आहे. स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टिमच्या माध्यमातून कचरा गोळा केला जाणार आहे. यासाठी प्रत्येक घराचे जिओ टॅगिंग करून घरांवर क्यूआर कोडचे स्टिकर लावण्यात येतील.
केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारच्या मान्यताप्राप्त कंपनीसोबत कचरा संकलन, ट्रॅकिंग आणि मॉनिटरिंग करण्याची मुभा प्रदान केली आहे. कचरा संकलन करणारा कर्मचारी आपल्या मोबाईलद्वारे क्यूआर कोड स्कॅन करेल आणि वजन करून कचरा घेईल. पहिल्यांदाच शहरात अशा पद्धतीची क्यूआर कोड सिस्टिम लावण्यात येत आहे. या व्यवस्थेमुळे नागरिकांच्या घरातून ठराविक वेळेत कचरा उचलला जाणार आहे.