Nagpur : टेंडर घोटाळा उघड होण्यापूर्वी कर्मचाऱ्याकडून माजी नगरसेवकाला जिवे मारण्याची धमकी?

Nagpur
NagpurTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : भाजपचे माजी नगरसेवक बाल्या बोरकर हे मनपाच्या परिवहन विभागातील टेंडर घोटाळा उघड करणार असल्याने विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र, बोरकर यांनी त्यांना मनपात कार्यरत असलेल्याच एका कर्मचाऱ्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. खळबळजनक बाब म्हणजे धमकी देत असताना संबंधित कर्मचाऱ्याच्या बाजूला भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे बसले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Nagpur
EXCLUSIVE : आमदार अण्णा बनसोडे यांनी आरोप केलेले चंद्रकांत गायकवाड आहेत तरी कोण?

या आरोपांमुळे भाजपच्या अंतर्गत वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी कार्यकर्ता म्हणून कर्मचाऱ्याला भेटलो होतो असे सांगत त्याने कुणाला फोन लावला याची कुठलीही माहिती नसल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात कोणाच्या दाव्यांमध्ये तथ्य आहे व घडलेला हा प्रकार केवळ धमकीचा आहे की, यामागे पक्षांतर्गत राजकीय स्पर्धा आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बाल्या बोरकर हे टेंडर घोटाळा उघड करण्यासाठी पत्रपरिषद घेणार होते. मात्र काही कारणांमुळे ती पत्रपरिषद त्यांनी रद्द केली. बोरकर यांनी केलेल्या आरोपांनुसार निखिल कावडे नावाच्या कर्मचाऱ्याला बंटी कुकडे यांनी तीन वर्षांअगोदर नोकरीला लावले होते. कावडे व त्याचे दोन साथीदार कामावर येतच नव्हते व तरीदेखील वेतन घेत होते. याबाबत मनपा आयुक्तांकडे दोन दिवसांअगोदर तक्रार केली.

Nagpur
Nagpur : महापालिकेला अचानक जाग; खड्डे बुजविण्यासाठी केले अभियान सुरु

कुकडे म्हणाले, कार्यकर्त्याला भेटलो तर काय झाले ?

याबाबत कुकडे यांना विचारणा केली असता त्यांनी निखिलची भेट घेतल्याचे स्पष्ट केले. निखिल हा भाजयुमोचा उपाध्यक्षदेखील आहे. त्याच्या नोकरीच्या ठिकाणी काही अडचण आल्याने भेटायचे असल्याचे त्याने सांगितले. मी रात्री एका फॅमिली रेस्टॉरंटमध्ये जेवण करत होतो. त्यामुळे त्याला तिथेच बोलाविले. त्याने तिथून कोणाला फोन लावले व काय बोलला याची मला काहीही कल्पना नाही. कार्यकर्ता या नात्याने मी त्याला भेटलो यात वावगे काय, असा सवाल कुकडे यांनी केला.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी काहीच कारवाई केली नसल्याचा आरोप बाल्या बोरकर यांनी केला आहे. त्यांना धाब्याचे सीसीटीव्ही फुटेजदेखील दिले आहे. मात्र पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्याची चौकशीदेखील केलेली नाही. जर कारवाई झाली नाही तर उपोषणाला बसेन असा इशारा त्यांनी दिला. पोलिसांनी या प्रकरणात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून, बोरकर यांनी दिलेल्या निवेदनावर चौकशी सुरू असल्याची माहिती तेथील ठाणेदार अतुल सबनीस यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com