नागपूर (Nagpur) : देशात सुमारे 905 किलोमीटर लांबीचे मेट्रो रेल्वेचे जाळे कार्यरत आहे. महाराष्ट्रात मुंबई, नागपूर आणि पुणे शहरांत मेट्रो रेल्वेचा विस्तार होत आहे. त्यात विशेषतः नागपूर शहरात आतापर्यंत 40 किलोमीटरचे मेट्रो रेल्वेचे जाळे तयार झाले असून, मेट्रोचा दुसरा टप्पा डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे. दुसरा टप्पा 43 किलोमीटरचा असल्याची माहिती केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी लोकसभेत दिली.
रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमाने यांनी लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. खासदार तुमाने यांनी, सध्या देशात सुरू असलेल्या मेट्रो रेल्वे नेटवर्कच्या लांबीचे (किलोमीटर) राज्यवार तपशील काय आहेत. राज्य, केंद्रशासित प्रदेश, ब्लॉक आणि शहर-निहाय तपशील आणि विलंबाची कारणे आणि प्रलंबित प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता किती वेळ आहे, परिचालित आणि मंजूर मेट्रो रेल्वे विभाग, विभाग आणि शहराच्या संदर्भात झालेली प्रगती, तसेच ते केव्हा पूर्ण होण्याची आणि कार्यान्वित होण्याची शक्यता आहे, असे तारांकित प्रश्न केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांना विचारले होते.
मंत्री हरदीपसिंह पुरी उत्तर देताना म्हणाले, मेट्रो रेल धोरण, 2017 नुसार, केंद्र सरकारला जेव्हा जेव्हा संबंधित राज्य सरकारकडून प्रस्ताव सादर केला जातो, तेव्हा प्रस्तावाची व्यवहार्यता आणि संसाधनांची उपलब्धता यावर अवलंबून शहरे किंवा शहरी भागातील मेट्रो रेल्वेच्या प्रस्तावांसाठी आर्थिक मदतीचा विचार केला जातो.
नागपूर शहरातील मेट्रोचा दुसरा टप्पा मिहान ते एमआयडीसीईएसआर, ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान नदी, लोकमान्य नगर ते हिंगणा, प्रजापती नगर ते ट्रांसपोर्ट नगर असा एकूण 43.80 किमीचा असणार आहे. त्यासाठी 6 हजार 708 कोटी रुपयांची तरतूद असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी दिली.
मेट्रो सुरु झाल्यास नागपूर जिल्ह्यातील लोकांना याचा जास्त फायदा होईल. तसेच ग्रामीण भागातून नागपूर शहरात येण्यासाठी कमी वेळ लागेल. रामटेक, कन्हान आणि इतर ग्रामीण परिसरातील लोकांना मोठ्या शासकीय दवाखान्यात जाण्यासाठी सुद्धा वेळ कमी लागेल.