नागपूर (Nagpur) : कामठी रोडवर (Kamthi Road) गड्डीगोदाम परिसरात तीन मजली उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. तिसऱ्या मजल्यावरून मेट्रो सुरू झाली. परंतु वाहनांसाठी असलेल्या दुसऱ्या मजल्याचे काम एलआयसी चौकातून पाटणी ऑटोमोबाईलपर्यंत सर्व्हिस रोडसाठी जागा नसल्याने रखडले होते. आता राज्य सरकारने जुन्या विकास योजनेत बदल केला असून, ३३ मीटरचा रस्त्याला मंजुरी दिली. परिणामी महापालिकेचा जागा अधिग्रहणासोबतच रखडलेल्या चार मजली पुलाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
गड्डीगोदाम क्रॉसिंग येथे महामेट्रो तीन मजली उड्डाणपूल तयार करीत आहे. जमिनीवरील मार्गानंतर पहिल्या मजल्यावर रेल्वे ट्रॅक, दुसऱ्या मजल्यावरून चारचाकी, दुचाकी वाहने, तर तिसऱ्या मजल्यावरून मेट्रो असा जागतिक दर्जाचा उड्डाणपूल तयार करण्यात येत आहे.
तिसऱ्या मजल्यावरून मेट्रो सुरू झाली. पहिल्या मजल्यावरून भारतीय रेल्वेही सुरू आहे. परंतु वाहनांसाठी असलेल्या दुसऱ्या मजल्याचे काम जागेअभावी रखडले आहे. मुळात एलआयसी चौकात या पूलाचा रॅम्प (पुलाचा भाग जमिनीशी जोडणे) प्रस्तावित आहे. परंतु एलआयसी चौक ते पाटणी ऑटोमोबाईलपर्यंतचा रस्ता विकास योजनेनुसार केवळ ३० मीटरचा आहे.
रॅम्प तयार केल्यास उड्डाणपुलाच्या बाजूने जमिनीवरून धावणाऱ्या वाहनांसाठी सर्व्हिस रोड तयार करणे शक्य नव्हते. त्यामुळे या रस्त्याची रुंदी वाढविण्याचा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारच्या नगर विकास विभागाकडे पाठविला होता. राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने मागील आठवड्यात एलआयसी चौक ते पाटणी ऑटोमोबाईलपर्यंतचा रस्ता ३३ मीटर करण्याबाबत अधिसूचना काढून महापालिकेला कळविले आहे. त्यामुळे आता महापालिकेचा अतिरिक्त जागा अधिग्रहणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिका अतिरिक्त जागा अधिग्रहण करून महामेट्रोकडे हस्तांतरीत करणार आहे. महामेट्रोने आतापर्यंत दुसऱ्या मजल्याचे काम मोठ्या प्रमाणात केले. परंतु रॅम्पसाठी जागा नसल्याने काम रखडले होते. आता या उड्डाणपुलाच्या कामाला वेग येण्याची शक्यता असून, तीन मजली पुलामुळे शहराच्या सौंदर्यात भर लवकरच भर पडणार आहे. विशेष म्हणजे या पुलासाठी विकास योजनेतच बदल करण्यात आला.
दीड हजार टन लोखंडाचा वापर
कामठी रोडवर एलआयसी चौकात उड्डाणपुलाचा रॅम्प तयार करण्यास या परिसरातील नागरिकांनी विरोध केला होता. परंतु महामेट्रोने नागरिकांशी संवाद साधला तर महापालिकेने याबाबतचा ठराव मंजूर केला. त्यामुळे जागतिक दर्जाच्या तीन मजली पुलाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला. या तीन मजली पुलावर दोन मजले पूर्णपणे लोखंडाने तयार केले आहे. यासाठी १ हजार ६३४ टन लोखंडाचा वापर करण्यात आला आहे. ७८ हजार लोखंडी बोल्टचा वापर करण्यात आला असून, या पूलाचे आयुष्यमान शंभर वर्षे आहे.