नागपूर (Nagpur) : शहराच्या चारही बाजूने मेट्रो सुरू झाली असून प्रवासी संख्या दोन लाखांपर्यंत पोहोचली. प्रवासी संख्या वाढताच मेट्रोचाही अधिक महसुलाचा लोभ वाढल्याचे दिसून येत आहे. कोट्यवधीच्या कर्जाच्या परतफेडीसाठी महामेट्रोने तिकिट दरात मोठी वाढ केली. त्यामुळे आता नागपूरकरांच्या खिशावर मेट्रोने प्रवास करण्यासाठी दुप्पट, तिप्पट भुर्दंड पडणार आहे.
महागाईने नागरिक संतप्त आहेत. पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे अनेक नागपूरकर मेट्रोकडे वळले. त्यामुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत सन्मानजनक वाढ झाली. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये मेट्रोने तीनदा दरवाढ केली. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. यापूर्वी एक ते सहा किमीसाठी पाच रुपये तिकिट दर आकारले जात होते. आता नव्याने तिकिट दरात वाढ केल्याने दोन किमी प्रवासासाठी १० रुपये तर चार किमीसाठी १५ तर सहा किमीसाठी २० रुपये मोजावे लागणार आहे.
अर्थात सहा किमीसाठी यापूर्वी पाच रुपये तर आता २० रुपये द्यावे लागणार असल्याने चौपट भुर्दंड पडणार आहे. यापूर्वी ९ किमीसाठी १० रुपये मोजावे लागत होते. आता २५ रुपये मोजावे लागणार आहे. १२ किमीसाठी १५ रुपयांऐवजी आता ३० रुपये मोजावे लागणार आहे. १५ किमीसाठी यापूर्वी २० रुपये द्यावे लागत होते, आता ३० रुपये द्यावे लागणार आहे. १८ किमीपर्यंत यापूर्वी ३५ रुपये तिकिट दर होते. आताही तेच दर कायम आहे. परंतु आता १८ किमीपेक्षा जास्त प्रवास करण्यासाठी ४१ रुपये तिकिट दर मोजावे लागणार आहे.
तिकिट दर वाढल्याचा फटका प्रवासी संख्येला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुळात आता नव्याने सुरू करण्यात आलेले तिकिट दर राज्य सरकारने २०१८-१९ मध्येच मंजूर केले होते. परंतु प्रवासी संख्या वाढविण्याच्या हेतून मेट्रोने हे दर लागू केले नव्हते. त्यानंतर कोरोना आल्याने तिकिट दरात वाढ करता आली नाही, असे मेट्रोतील सुत्राने नमूद केले.