नागपूर (Nagpur) : नागपूर न्यास प्रकरणात (NIA) मी नगरविकास मंत्री अथवा मुख्यमंत्री म्हणून कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत स्पष्ट केले. नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरणात विधान परिषदेत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या मुद्यावरून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांकडून विधानसभेतही प्रयत्न सुरू होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावताना विरोधी बाकांवरील महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर विरोधी पक्षाने हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते तर उपमुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत उत्तर का दिले, असा सवाल केला. त्यानंतर सभागृहात बोलू दिले जात नसल्याचे सांगत विरोधकांनी सभात्याग केला.
विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. भाजप आमदार आशिष शेलार आणि ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांच्यात वाद झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत वादावर पडदा टाकला.
मुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात निवेदनात म्हटले की, 2007 साली 49 ले आऊट मंजूर झाले होते. 2015 साली 34 भूखंडांना त्यावेळी मान्यता देण्यात आली होती. त्यावेळी एनआयटीच्या प्रमुखाने त्याला रेडी रेकनरच्या दराने पैसे भरण्यास सांगितले. तर एकाने गुंठेवारीनुसार पैसे भरण्यास सांगितले. त्यावेळी वेगवेगळे दर सांगण्यात आल्याने ते प्रकरण माझ्याकडे अपिलासाठी आले होते. शासन निर्णयानुसार आणि तरतुदींनुसार निर्णय घेण्याची सूचना त्यावेळच्या एनआयटी प्रमुखांना केली होती.
आपल्यावरील आरोप फेटाळून लावताना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले की, नगरविकास मंत्री म्हणून मी कोणताही गैरव्यवहार केला नाही. 2009 साली शासनाचे जे दर होते, त्यानुसार रक्कम आकारण्यात आली आहे. ही जमीन बिल्डरला दिली नसल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
14 तारखेला मला एक पत्र आले आणि कोणीतरी कोर्टात गेले आहे असे कळले. एक सदस्याची गिलानी समिती नेमली गेली होती. माझ्यासमोर प्रकरण येत असताना समिती नेमली गेली आहे, याची माहिती लपवण्यात आली. त्यानंतर माझ्या निदर्शनास ही बाब आली होती, असेही त्यांनी सांगितले. मात्र, आता ही बाब माझ्या लक्षात आणून देण्यात आली आहे. त्यामुळे आता जे कोर्टाने आदेश दिले आहेत त्यानुसार कारवाई करावी हा निर्णय 2021 साली मी पारित केला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावरील नागपूर न्यास जमीन घोटाळ्याचे आरोप फेटाळून लावताना विरोधकांवर हल्लाबोल केला. शिंदे म्हणाले की, काल अनेक बैठका झाल्या. या बैठकांमध्ये एकनाथ शिंदे सापडला आहे, त्याला धरा असा निर्णय झाला अशी माहिती असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, ज्यांनी हे प्रकरण काढले त्यांच्याकडे या प्रकरणाची पूर्ण माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही तुमच्या सारखे नसून बिल्डरकडून 350 कोटी आम्ही लुटून कोणाच्या घशात घातलेले नाहीत, अशा शब्दांत शिंदेंनी हल्लाबोल केला.