नागपूर (Nagpur) : या सांडपाण्याचे करायचे काय असा प्रश्न सर्वच शहरांना पडला आहे. नागपूर सुधार प्रन्यासने शहरात विविध ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्र बांधण्याचे काम सुरू केले. यातील पाणी बांधकामासाठी वापरले जाणार आहे.
सध्या आठ केंद्रांचे काम पूर्ण झाले आहे. या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पाण्याचा पुनर्वापर बांधकामासाठी करण्यात येणार आहे. या पाण्याच्या पुनर्वापरासाठी नागपूर सुधार प्रन्यास व क्रेडाई या संस्थेमध्ये आज करार करण्यात आला. शहरातील पिण्याच्या पाण्याची बचत करण्यासाठी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. जलपुनर्भरण, उद्यानांशिवाय या पाण्याचा वापर बांधकामासाठी करण्याचा निर्धार नासुप्र सभापती व एमएमआरडीएचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी केला होता.
आज त्यांनी क्रेडाई मेट्रो नागपूरसोबत करार केला. क्रेडाई मेट्रो नागपूरचे अध्यक्ष विजय दरगण, सचिव गौरव अगरवाल व इतर सदस्य तसेच एनएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त अविनाश कातडे, अधीक्षक अभियंता लिना उपाध्ये उपस्थित होत्या. नागपूर सुधार प्रन्यासने ६३.८ एमएलडी क्षमतेचे ८ प्रक्रिया केंद्राचे काम पूर्ण केले. सध्या ४८.५ एमएलडी प्रक्रिया केलेले पाणी उपलब्ध आहे. अंबाझरी तलावाच्या बाजूला नीरीच्या फायथोराईड तंत्रज्ञानावर आधारित प्रक्रिया केलेले पाणी अंबाझरी तलावात सोडण्यात येत आहे. सोनेगाव तलावानजीकच्या प्रक्रिया केंद्रातील पाणी सोनेगाव तलावात सोडण्यात येत आहे. आयआयटी मुंबईने विकसित केलेल्या एसबीटी तंत्रज्ञानावरील केंद्रातील पाणी इंडियन एअर फोर्सच्या गोल्फ कोर्सच्या हिरवळीसाठी देण्यात येत आहे. उर्वरित सोमलवाडा, इटभट्टी, हजारीपहाड व दाभा येथील प्रक्रिया केंद्र एसबीआर तंत्रज्ञानावर आधारित आहे. मलजल प्रक्रिया केंद्रातून येणारे पाणी हे बांधकाम, जलसिंचन, उद्यान इत्यादी पिण्याव्यतिरीक्त बाबींसाठी वापरण्यात येऊ शकते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ताज्या पाण्याची बचत होऊन पाणी टंचाईच्या समस्येवर काही प्रमाणात नियंत्रण येऊ शकेल तसेच शिवाय जमिनीतील जलस्तर वाढू शकेल, असे यावेळी मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले. बांधकामासाठी मुबलक पाणी मिळणार असून गाळेधारकांना फ्लशिंग व उद्यानात त्याचा वापर करता येणार आहे