नागपूर (Nagpur) : नागपुरात 20 जुलैला अतिवृष्टी झाली, काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक लोकांच्या घरात पावसाचे पाणी घुसले होते. मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तू आणि सामानाचे नुकसान झाले. ज्या परिसरात नुकसान झाले आहे, त्या परिसरात पंचनामे करण्याचे आदेश मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. तर नागपुरात ड्रेनेज सिस्टीम फेल ठरल्याचे सुद्धा ते म्हणाले.
सोबतच महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, पावसाच्या पाण्याचा निचरा न होणे आणि स्टॉर्म वॉटर लाइन नेटवर्कचा अभाव यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरले. नागपूर सुधार प्रन्यासच्या शेकडो वस्त्या आणि सीमावर्ती परिसरात पुरामुळे सर्वाधिक नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. येथील स्टॉर्म वॉटर लाइनचे जाळे मजबूत नसल्याने वस्त्या व घरांमध्ये पाणी साचले.
शहरातील 456 वस्त्या आणि रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याची प्रकरणे समोर आली आहेत. प्रामुख्याने 10 हजार घरे आणि इतर आस्थापने बाधित होऊ शकतात. मात्र पंचनाम्यानंतरच खरी परिस्थिती कळेल. महापालिकेकडून मदतकार्य सुरू केले आहे. तसेच नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण व पंचनामा करण्याच्या प्रक्रियेसाठी जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाला कळविण्यात आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच बाधित भागाचा पंचनामा केला जाईल आणि लोकांना आर्थिक मदत दिली जाईल.
पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेत आयुक्त डॉ. चौधरी यांनी सांगितले की, शहरात महापालिकेशिवाय एनआयटी, पीडब्ल्यूडी, एनएचएआय कार्यरत आहेत. त्यांनी तयार केलेल्या रास्त्यावर खड्डे पडल्यास सुद्धा महापालिकेला जबाबदार धरले जाते. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी स्टॉर्म वॉटर लाइन असणे आवश्यक आहे. महापालिकेच्या बाजूने यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत.
सिमेंट रस्त्यामुळेही पाणी साचले
सिमेंट रस्त्यांमुळे अनेक भागात पूर येत असल्याच्या प्रश्नावर डॉ. चौधरी म्हणाले की, हे काही अंशी खरे आहे. मानेवाडा येथील सिमेंट रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे लोकांच्या घरात पाणी शिरले, यावर उपाय शोधला. तसेच सिमेंट रोड टप्पा-4 मधील पावसाच्या पाण्याचा निचरा करून रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. व्हीएनआयटीच्या तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. एवढेच नाही तर जिथे जिथे पाणी साचण्याची समस्या आहे तिथे ती ओळखून दूर केली जात आहे. ड्रेनेज व्यवस्था सुधारण्यासाठी अतिरिक्त पैसा खर्च करण्याचीही तयारी आहे.
पुढे मनपा आयुक्त डॉ. चौधरी म्हणाले की, कागद काळे करून रस्त्यांची कामे होणार नाहीत, तर यासाठी एनआयटीनेही जबाबदारी घेतली पाहिजे. अंबाझरी तलावातील पुरानंतर उचललेल्या पावलांवर डॉ. चौधरी म्हणाले की, बाधित क्षेत्राचा मोठा भाग एनआयटीच्या अखत्यारीत येतो. महापालिकेच्या वतीने बराच पत्रव्यवहार करण्यात आला. एनआयटीकडून पत्रेही आली. पण कागद काळे करून काम होत नाही, तर काम करावे लागते. एनआयटीनेही आपली जबाबदारी समजून शहराच्या विकासासाठी काम करावे.