नागपूर (Nagpur) : नागपूर सुधार प्रन्यासने (NIT) आगामी वर्षात अनधिकृत लेआऊटमध्ये 156 कोटींची विकासकामे आणि शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण व सिमेंट रस्ते बांधण्यासाठी 85 कोटी रुपये खर्च करण्याचा संकल्प सोडला आहे.
882.81 कोटी सुधार प्रन्यासचा अर्थसंकल्प सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, विश्वस्त आमदार मोहन मते, संदीप इटकेलवार, नगररचना विभागाचे सहसंचालक व विश्वस्त प्रमोद गावंडे, एनआयटीचे महाव्यवस्थापक अविनाश कातडे, अधीक्षक अभियंता प्रशांत भांडारकर, कार्यकारी अधिकारी अविनाश गंधे, मुख्यलेखा व वित्त अधिकारी विलीन खडसे, कार्यकारी अभियंता ललित राऊत, शाखा अधिकारी राजेश काथवटे आदींच्या उपस्थितीत सादर करण्यात आला.
अर्थसंकल्पात नवीन अभिन्यासामध्ये मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी 156, रस्त्यांचे डांबरीकरण व सिमेंट रोडसाठी 85 कोटी, दलित वस्ती सुधार योजना, दलितेत्तर वस्ती सुधार योजना, आमदार निधी, खासदार निधी, मौजा मानेवाडा येथील ई-लायब्ररी, इस्लामिक कल्चरल सेंटर, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान, अपंग व्यक्तीच्या हक्कांच्या अंमलबजाणोसाठी योजना इत्यादी विविध विकासकामांसाठी 356.57 कोटींची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.
महानगर पालिका क्षेत्रात मुलभूत सुविधा पुरविण्याकरीता विशेष शासकीय अनुदानातून विकासकामाकरिता 200 कोटींचे प्रावधान करण्यात आले आहे. एनआयटीला घरबांधणीतून 50 कोटी, भूखंड व दुकानाच्या भाडेपट्ट्याद्वारे 50 कोटी, विकास निधी 50 कोटी प्राप्त होणे अपेक्षित आहे.