नागपूर (Nagpur) : नाग नदीच्या (Nag River) संवर्धनासाठी 2400 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केली आहे.
उपराजधानी नागपुरात नाग नदीने नाल्याचे स्वरूप घेतले होते. वाढत्या लोकसंख्येमुळे दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ होत आहे. विशेष म्हणजे कचऱ्यामुळे नाग नदीला नाल्याचे स्वरूप आले होते. म्हणून नागपूर महापालिकेने 2017 पासून नाग नदी स्वच्छता अभियान सुरू केले. त्यानंतर 2022 मध्ये महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी पुन्हा पूर्व नागपुरातील सेंट झेव्हियर शाळेजवळ नाग नदीवरून या सफाई अभियानाला सुरवात केली. यावेळी आयुक्तांनी नदीच्या स्वच्छतेसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले होते.
नदी स्वच्छता अभियान दोन टप्प्यांत राबविल्या गेले. नदी व नाले स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी 0.8-1.5 लाख मेट्रिक टन गाळ काढण्यात येतो. यावर्षी नदी स्वच्छता अभियान अंतर्गत नद्यांची रुंदी व खोली पूर्णपणे स्वच्छ करून पावसाळी पाणी वाहण्याकरिता सुरळीत प्रवाह करण्यात येईल. याद्वारे वाहणाऱ्या पाण्याची क्षमता वाढेल आणि नदी काठावर असलेल्या वस्त्यांत पावसाळ्यात येणाऱ्या पुरापासून सुरक्षा प्रदान होईल.
वाहनांच्या कर्कश आवाजापासून लवकर आराम मिळेल. वाहनांचे हॉर्नही सुरेल असतील. या संदर्भात धोरण आखण्यासाठी केंद्र सरकार नवीन कायदा करत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. पर्यावरण रक्षणासाठी जनतेच्या सहकार्याचे आवाहन करून ते म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी वाहने लवकरच बंद करण्यात येतील. हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषणामुळे सार्वजनिक आरोग्य बिघडत आहे. वाहनांच्या आवाजावर नियंत्रण राहील.
वनराई फाउंडेशनच्यावतीने डॉ. मोहन धारिया राष्ट्र निर्माण पुरस्कार गडकरी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी गडकरी बोलत होते. आयटी पार्क येथील पर्सिस्टंट ऑडिटोरियममध्ये रविवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाग नदीच्या संवर्धनासाठी 2400 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा गडकरी यांनी यावेळी केली.
शहर जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. देशभरात रस्ते अपघात होत आहेत. या अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 5 धोरणात्मक निर्णयांसोबतच वाहन चालविण्याच्या बाबतीत दक्षता घेणे आवश्यक आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी समाजाने पुढे यायला हवे. पावसाळ्यापूर्वी 3 मीटर उंचीची सर्व झाडे लावावीत. हवा शुद्ध राहील, आरोग्यही सुधारेल. प्रत्येक प्रभागात 3 मीटर उंचीची 500 झाडे लावा. सामाजिक संस्थांनी योगदान द्यावे, असे आव्हान नितीन गडकरी यांनी केले.