नागपूर (Nagpur) : राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या शहरात जी-20च्या बैठकीच्या (G-20) पार्श्वभूमीवर महापालिकेकडून चोरीची वीज घेतल्याचे दृश्य दिसते आहे. विशेष म्हणजे महापालिकेने G-20च्या नावावर शहराला रोषणाईने सजविण्यासाठी अंदाजे 21.23 कोटी खर्च केले आहे. मात्र एवढी कोट्यवधीची रक्कम खर्च करून चोरीची वीज घेणे हे कृत्य अशोभनीय आहे.
हॉटल रेडिसन ब्लू येथे होणाऱ्या C -20 बैठकीसाठी विविध देशातील पाहुण्यांचे रविवारी आगमन झाले आहे. नागपुरात दिनांक 20, 21 आणि 22 मार्च रोजी G - 20 अंतर्गत C - 20 परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेला विविध देशातील तसेच देशाच्या वेगवेगळ्या राज्यातून एकूण 300 पाहुणे आले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी नागपूर महापालिकेसह शासनाच्या विविध विभागाकडून रस्त्यांवर आकर्षक रोषणाई व सौंदर्यीकरण केले गेले आहे. परंतु वर्धा रोड, सिव्हिल लाईन्स परिसरात आकर्षक रोषणाईसाठी थेट महावितरणच्या वीज वितरण पेटीत तार जोडून नियमबाह्य वीज घेतल्याच दिसून आले.
पावसामुळे करंट निर्माण होण्याचा धोका
मागील दोन ते तीन दिवसांपासून नागपुरात वादळी पाऊस पडला. शहरात झाडांवर लागलेल्या रोशनाई, फोकस लाईटमुळे करंट येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे नागरिकांना धोका होऊ शकतो. कुणाचाही लक्ष न राहता झाडावर लटकलेल्या एखाद्या रोशनाईला स्पर्श झाला की त्याला विजेचा झटका लागू शकतो.
विशेष म्हणजे महापालिकेच्या उद्यान विभागाने चक्क झाडांवर खिळे ठोकून रोषणाई लावली आहे. यासंदर्भात उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे.
नियमबाह्य घेतली वीज
काही ठिकाणी नागपूर महापालिकेच्या पथदिव्याला जोडून नियमबाह्य वीज घेतली आहे. पथदिव्याची वीज महापालिकेला 7.51 रुपये प्रतियुनिट या सवलतीच्या दरात मिळते. तात्पुरते मीटर घेतल्यावर वीज सुमारे 13 रुपये युनिट दराने घ्यावी लागते. त्यामुळे या पद्धतीची जोडणीही नियमबाह्य असल्याचे वीज क्षेत्रातील जाणकार सांगतात.
महापालिकेच्या विद्युत विभागाने एयरपोर्ट रोड ते प्राइड होटेल ते ली मेरेडियन हॉटेल रोडपर्यंत आणि शहराच्या आकाशवाणी चौक, सीताबर्डी, धरमपेठ, संपूर्ण सीव्हील लाईन परिसर, संविधान चौक सोबत शहरातील महत्त्वपूर्ण चौकात विद्युतीकरणाचे काम केले आहे. ज्यावर तब्बल 21.23 कोटी खर्च केले गेले.
महावितरणने 12 ठिकाणी दिली जोडणी
जी-20 साठी गेल्या दोन दिवसांत धरमपेठ भागात 2, सदर भागात 2, सोमलवाडा भागात 5, अजनीत 3 अशा एकूण 12 तात्पुरत्या जोडण्या दिल्याचे महावितरणच्या जनसंपर्क विभागाने सांगितले. विशेष म्हणजे महावितरणने या संबंधित वीज सेवा खंडित सुद्धा केली होती. तरीसुद्धा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडो दुर्लक्ष केले आहे.