नागपूर (Nagpur) : महाराष्ट्र सरकारने व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड (Property Card) पद्धतीसंदर्भात एक अध्यादेश प्रसिद्ध करून त्यावर लोकांच्या हरकती मागविण्यात आल्या होत्या. मंजुरीनंतर लवकरच ही पद्धत राज्यात लागू केली जाणार आहे.
शहरी व ग्रामीण भागात अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या फ्लॅटधारकांना त्यांचे स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात 'अपार्टमेंट डीड' असलेल्यांना आणि महारेरा नोंदणीकृत योजनांमधील फ्लॅटमालकांना व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड देण्याबाबत महसूल विभागाकडून नियोजन करण्यात येत आहेत.
फ्लॅट पद्धतीत स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड अस्तित्वात नाहीत. फ्लॅटमालकांशी नोंदणी किंवा करार होतात. मनपाकडे त्यांची नावे असतात. मात्र, महसूल विभागाकडे त्याची कोणत्याही प्रकारची नोंद नसते, स्वामित्व, बँकेचे कर्ज व इतर विवरणांसह फ्लॅटसाठी पूरक व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड निश्चित करण्यात येणार आहे.
नागपूर शहरात पाच हजारांपेक्षा जास्त अपार्टमेंट आणि जवळपास 80 हजारांपेक्षा जास्त फ्लॅट आहेत. या फ्लॅटधारकांच्या अजूनही सोसायट्या तयार झालेल्या नाहीत. त्यामुळे अनेकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. पण प्रॉपर्टी कार्ड मुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण होईल.
यापूर्वीच्या पद्धतीनुसार शहरातील प्रत्येक सर्व्हे क्रमांकाला एकच प्रॉपर्टी कार्ड देण्यात येत होते. त्यामुळे संबंधित सर्व्हे क्रमांकावरील घरे - सोसायट्यांचा समावेश एकाच प्रॉपर्टी कार्डमध्ये केला जायचा. एकाच सर्व्हे क्रमांकावर प्रॉपर्टी कार्ड देण्यात आल्याने सोसायटीतील एखाद्या सदस्याने कर्ज घेतले, तरी त्याची नोंद या कार्डवर केली जायची. त्याचा नाहक त्रास इतरांनाही सहन करावा लागायचा.
प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मिळकत पत्रिका किंवा मालमत्ता पत्रक आहे. महाराष्ट्र सरकार डिजिटल स्वाक्षरीतले प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी आता तुम्हाला सरकारी कार्यालयात जायची गरज नाही. तुम्ही घरबसल्या मोबाइलवरही ते काढू शकता.