नागपूर (Nagpur) : आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत 2023-2024 या आर्थिक वर्षात वित्त विभागाने द्वितीय तिमाहीकरिता अर्थसंकल्पित तरतुदीच्या 20 टक्के निधी वितरणाचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाच्या अंमलबजावणीस विलंब झाला. त्यामुळे निधीकडे नजरा लागल्या होत्या. अखेर नियोजन विभागाने जिल्ह्यातील सहा व एक शिक्षक आमदार अशा सात लोकप्रतिनिधींना 4 कोटी 90 लाखांचा निधी मंजूर केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात वने, सांस्कृतिक तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, यावेळी आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, एक आमदार कीर्तीकुमार भांगडिया तसेच शिक्षक आमदार सुधाकर अडबाले आपापल्या विधानसभेचे नेतृत्व करतात.
आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत 2023-2024 या आर्थिक वर्षात वित्त विभागाने द्वितीय तिमाहीकरिता अर्थसंकल्पित तरतुदीच्या 20 टक्के निधी वितरणाचा निर्णय घेतला होता. मात्र, नियोजन विभागाने हा निधी वितरित केला नाही
2023-24 या आर्थिक वर्षाकरिता विद्यमान विधानसभा सदस्यांना प्रत्येकी 70 लाख रुपयांप्रमाणे निधी वितरित करण्याचे निश्चित झाले होते. नियोजन विभागाने हा निधी बुधवारी मंजूर केला आहे.
जिल्हा खनिज विकास निधीचा तिढा कधी सुटणार?
अर्थसंकल्पित तरतुदीच्या 20 टक्के निधी मोठा नाही. पण यातून आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत काही तातडीने कामे मार्गी लागू शकतात. आपल्या क्षेत्रातील कामे करण्यास आमदार निधीचा मोठा वाटा असतो. शिवाय, जिल्हा खनिज विकास निधीची आमदारांना मागणी करता येते. परंतु, सद्यस्थिती जिल्हा खनिज विकासाचा तिढा अजूनही सुटला नाही. त्यामुळे कोट्यवधींचा हा निधी विकासकामांच्या खर्चाविना पडून आहे.
मंजूर निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे
जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती यांना नियोजन विभाग 12 जुलै 2016च्या तरतुदीला अधीन राहून या निधीचे वितरण करायचे आहे. वेळोवळी अनुज्ञेय केलेल्या बाबींवरील खर्च पुढील लेखाशीर्षांतर्गत 2023-24 या आर्थिक वर्षात उपलब्ध तरतुदीमधून भागविण्याची सूचनाही नियोजन विभागाने केली.