नागपूर (Nagpur) : युद्ध न करता जिंकून देणारा, समता आणि बंधुतेची शिकवण देणारा, बुद्ध धम्म डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरात दिला. यामुळे दीक्षाभूमी जगाच्या नकाशावर आली. आता जगभरातील बौद्धांच्या नव्हेतर अखिल मानवाच्या आकर्षणाचे केंद्र दीक्षाभूमी आहे. विकसित देशांचा विकास हा बुद्ध तत्वज्ञानानेच झाला आहे. यामुळेच दीक्षाभूमीच्या विकासाचे पर्व सुरू झाले असून आराखडा तयार झाला आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षामंडपात 200 कोटींच्या विकासकामांचे ई-भूमिपूजन करण्यात आले.
दीक्षाभूमीवर आयोजित 67 वा धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भन्ते आर्य नागार्जून सुरई ससाई होते.
यावेळी राज्य सरकारकडून मंजूर झालेल्या 200 कोटींच्या दीक्षाभूमीच्या विकासकामांचे ई- भूमिपूजन करण्यात आले. त्यापैकी 70 कोटी रुपयांचा धनादेशही वितरित करण्यात आला.
फडणवीस म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षेसाठी नागपूरची निवड केली, त्यामुळेच जगभरात नागपूरचे नाव झाले. दीक्षाभूमीच्या विकासाचे दुसरे पर्व आम्ही हाती घेतले आहे. 200 कोटी रुपयांमधून दीक्षाभूमीचा विकास होणार असून, येत्या काळात दीक्षाभूमी ही जागतिक दर्जाची होईल.
इंदू मिल येथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम 6 डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होईल, असा आश्वासनही त्यांनी व्यक्त केला.
दीक्षाभूमीच्या विकासकामांना निधी कमी पडणार नाही : मुख्यमंत्री
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दृकश्राव्य माध्यमातून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा पाठविल्या. 200 कोटींचे विकासकार्य दीक्षाभूमीवर लवकरच पूर्ण होईल. या संपूर्ण 22.80 एकर परिसराचा कायापालट केला जाईल. दीक्षाभूमी व चैत्यभूमीवरील विकास कार्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, सर्व कामे जागतिक मानांकनाची व गतीने करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.