नागपूर (Nagpur) : गावतील रस्त्याचे खडीकरण करायचे की सिमेंटीकरण यावरून आमदार टेकचंद सावकर आणि जिल्हा परिषद सदस्य तापेश्वर वैद्य यांच्यात जुंपल्याने जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत याचे पडसाद उमटले. शेवटी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेऊन भाजप आणि काँग्रेसने यातून आपले अंग काढून घेतले.
जिल्ह्यात धानला ग्रामपंचायत अंतर्गत रस्ता बांधकामावरून एका सिमेंट रस्त्यावरून आमदार सावरकर व सभापती वैद्य यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. ग्रामपंचायतची मागणी नसतानाही आमदारांनी सिमेंटीकरणाचा प्रस्ताव टाकला. तर जनसुविधेतून सभापती वैद्य यांनी खडीकरणाचा प्रस्ताव सादर केला होता. त्यास सुरवातही झाली होती. प्रशासनाने कुठलीही शहानिशा न करता एकाच रस्त्यांवर दोन कामांना मंजुरी दिली. अध्यक्षा रश्मी बर्वे यांच्या अध्यक्षतेत शेवटची स्थायी समितीची बैठक झाली. यात हा मुद्दा वैद्य यांनी उपस्थित करीत आमदाराच्या दबावात प्रशासन कार्य करीत आहे का, असा सवाल केला.
जून २०२१ मध्ये सिमेंट रस्त्याचा ग्रामपंचायतीने ठराव घेतला. ३० मार्च २०२२ रोजी जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली. त्या कामाचा कार्यारंभ आदेश खंडविकास अधिकाऱ्यांनी १४ जुलै रोजी दिला. १६ जुलैपासून रस्त्याचे काम सुरू केले. मात्र ग्रामपंचायतीने आमदाराकडे कामाची मागणी केली नसताना सचिवावर दबाव आणून रस्त्याच्या खडीकरणाचे पत्र घेतले.
जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणून आमदार फंडातून त्याच कामाचे कार्यादेश काढले. २५ जुलै रोजी शासनाने वर्क ऑर्डर न झालेल्या कामावर स्थगिती आणली. गत चार बैठकीत हा विषय गाजत असून प्रशासनाच्या भूमीकेवर सत्ताधाऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शेवटी सोमवारी नियोजन अधिकाऱ्यावर कारवाईचा ठराव घेण्यात आला.