नागपूर (Nagpur) : नागपूरच्या जेएमएफसी कोर्टाने अंबाझरी पोलिसांना मेसर्स गरुड अम्युझमेंट पार्क प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांविरुद्ध एफआयआर (FIR) नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.
शहरातील प्रताप नगर रोड येथे राहणारे राजेश गजघाटे यांच्या तक्रारीवरून न्यायालयाने हा आदेश दिला आहे. मागच्या महिन्यातच अंबाझरी अम्युझमेंट पार्कचे भूमीपूजन करण्यात आले. सुरवातीपासूनच या प्रकल्पाला अनेक नेत्यांचा आणि स्थानिक लोकांचा विरोध होता.
असे आहे संपूर्ण प्रकरण
फिर्यादीनुसार, शहरातील अंबाझरी गार्डन संकुलात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन होते. उद्यान संकुलात 19 एकर जागेवर सांस्कृतिक भवन संकुल, 19 एकर परिसर उद्यान आणि 6 एकर परिसर तलाव आहे. 19 ऑगस्ट 2019 रोजी राज्याच्या महसूल आणि वन विभागाने या संकुलाची 44 एकर जमीन महाराष्ट्र पर्यटन विकास विभागाला (MTDC) 30 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिली. न्यायालयाला असेही सांगण्यात आले आहे की, डॉ. आंबेडकरांच्या स्मृतीप्रित्यर्थ नागपूर महानगरपालिकेने या संकुलात 1975 साली सांस्कृतिक भवन बांधले, मात्र अलीकडेच एमटीडीसीने या संकुलात दुकाने, अॅम्फी थिएटर व इतर विकासकामे करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी मेसर्स गरुड अम्युझमेंट पार्क नावाच्या कंपनीला कोट्यवधींचे कंत्राटही देण्यात आले आहे. 2021 मध्ये कोरोनाचा काळ सुरू असताना कॅम्पसच्या 44 एकर जमिनीचे हक्कही कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आले. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अचानक एके दिवशी ही इमारत बेकायदेशीरपणे पाडली. एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांनीही त्याला परवानगी दिली.
तक्रारीत, न्यायालयाला विनंती करण्यात आली होती की सर्वांविरुद्ध आयपीसी 120-बी, 34, 295, 425 आणि इतर अंतर्गत एफआयआर नोंदवा. न्यायालयाने सध्या पोलिसांना कंपनीच्या संचालकांविरुद्ध तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
44 एकरच्या प्रशस्त परिसरात साकार होणारा हा जागतिक दर्जाचा थीम पार्क असणार आहे. या अंतर्गत विविध छोटे-मोठे प्रकल्प साकारले जाणार आहेत. आद्य क्रांतिवीर लहूजी साळवे उद्यान (अंबाझरी उद्यान) विकास प्रकल्पांतर्गत उच्च व्यावसायिक तज्ज्ञांनी डिझाईन केलेला व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असा 44 एकरच्या प्रशस्त परिसरात साकार होणारा जागतिक दर्जाचा थिम पार्क आहे. 20 हजार चौरस फुटांच्या प्रशस्त परिसरात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर थीम पार्क साकारले जाणार आहेत.
90 कोटींचे टेंडर
महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे गरुडा अम्युझमेंट पार्क प्रा. लि. या कंपनीला टेंडर देण्यात आले आहे. हे टेंडर अंदाजे 80-90 कोटींचे आहे. 14 एप्रिल 2024 पर्यंत म्हणजेच एका वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भवन निर्माण करण्यात येणार आहे.