नागपूर (Nagpur) : उपराजधानीच्या इंदोरा ते दिघोरी मुख्य चौकात बनणारा ओव्हरब्रीज प्रकल्प आताही कागदावरच असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाची किंमत 526 कोटींवरून 760 कोटींवर गेली. मागील 7 वर्षांपासून नागपूरकर उड्डाणपूल बनण्याची वाट पाहत आहेत, मात्र या प्रकल्पाचे भूमीपूजन ही झाले नाही.
गेल्या सात वर्षांत शहरात मेट्रो डबल डेकर उड्डाणपुलावरून धावू लागली. शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळाला. परंतु सात वर्षांपासून इंदोरा ते दिघोरीपर्यंतचा उड्डाणपूल वेगवेगळ्या अडथळ्यांच्या शर्यतीत अडकला आहे. शहरातील सर्वात लांबीच्या या प्रकल्पाची किंमत 526 वरून आता 760 कोटींवर गेली. अद्यापही हा प्रकल्प कागदावरच असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील पारडी उड्डाणपुलाचे काम संथगतीने होत असल्याने नागरिकात असंतोष आहेच. त्यात सात वर्षापूर्वी आराखडा तयार करण्यात आलेल्या इंदोरा - दिघोरी चौक उड्डाणपूल कागदातून अद्याप पुढे सरकरला नाही. सुरुवातीला कमाल टॉकीज चौकातील व्यापाऱ्यांनी या पुलाविरोधात आंदोलन केले होते. त्यामुळे कमाल टॉकीज चौक ते अशोक चौक असा या उड्डाणपुलाचा आराखडा तयार करण्यात आला. त्यानंतर गोळीबार चौक व अग्रसेन चौक ते भांडे प्लॉटपर्यंतचाही प्रस्ताव तयार करण्यात आला. व्यापाऱ्यांचा विरोध व विविध आराखडे अशा अनेक समस्यांमध्ये हा उड्डाणपूल सात वर्षांपासून अडकला आहे.
टेंडर प्रक्रिया सुरू
या उड्डाणपुलाच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने डिसेंबरपासून वेगवेगळ्या कामाच्या टप्प्याबाबत टेंडर प्रक्रिया सुरू केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. 8.90 किमी लांबीच्या या पुलासाठी 760 कोटी 76 लाखांच्या टेंडर काढण्यात आल्याचे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.
234 कोटींची झाली वाढ
सात वर्षात या प्रकल्पाच्या किमतीत 234 कोटींनी वाढ झाली आहे. या प्रकल्पामुळे उत्तर नागपूर व दक्षिण नागपूरचे टोक जोडले जाणार आहे. त्यामुळे गोळीबार चौक, अग्रसेन चौक, महाल परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून मुक्ती मिळणार आहे. विशेष म्हणजे 8.90 किमीचा हा पूल शहरातील सर्वात लांब उड्डाणपूल ठरणार आहे. या पुलासाठी रेल्वे, महामेट्रोनेही हिरवी झेंडी दाखवली.
अशोक चौकात पाच रस्ते जोडणार
उमरेड रोड, मेडिकल चौक, बैद्यनाथ चौक, जगनाडे चौक व चिटणीस पार्ककडून येणारे रस्ते अशोक चौकाला छेदून पुढे जातात. या प्रस्तावित उड्डाणपुलाला हे पाचही रस्ते जोडण्यात येणार आहे. त्यामुळे येथे एकप्रकारे 'रोटरी' तयार होणार आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे