वर्धा (Wardha) : आर्वी शहरालगतच्या बाभूळगाव येथील शैलेश अग्रवाल यांच्या खासगी जागेवरील अतिक्रमणधारकांना घरकुल बांधकामासाठी पट्टे देण्याबाबतच्या विषयावर नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार दादाराव केचे यांनी प्रश्न उपस्थित केला. यासंदर्भात बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी दिले. विधानसभा अध्यक्ष समीर कुणावर यांनीही हा प्रश्न महत्त्वाचा असून, स्वतःच्या जिल्ह्यातला असल्याचे सांगत मंत्र्यांना याविषयी विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहे.
बाभूळगाव येथे शेतकरी प्रेमकिशोर अग्रवाल यांच्या मालकीच्या जागेवर 1985 ते 90 च्या सुमारास अतिक्रमण करुन नागरिकांनी राहण्यास सुरुवात केली होती. त्याप्रकरणी अग्रवाल यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने सदर जागेवरचे अतिक्रमण हटविण्याबाबत अग्रवाल यांच्या बाजूने निर्वाळा दिला होता. दरम्यान प्रेमकिशोर अग्रवाल यांची 1997 मध्ये याच वस्तीत राहणाऱ्या काही नागरिकांनी हत्या केली. त्यानंतर वयाच्या अठराव्या वर्षी प्रेमकिशोर यांचे चिरंजीव शेतकरी आरक्षणाचे प्रणेते, अ. भा. काँग्रेसच्या किसान सेलचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी हा लढा रेटून धरला. न्यायालयाने शैलेश अग्रवाल यांच्या बाजूने पुन्हा निकाल दिला. त्यानंतर बाभूळगाव येथे अतिक्रमित जागेवरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. ते हटविताना या ठिकाणी राहणारे बहुसंख्य लोक अत्यंत गरीब व दारिद्र्यात जीवन जगणारे असून निवाऱ्यासाठी दुसरे कोणतेही साधन नाही. म्हणून जमिनीचा ताबा घेतल्यानंतर त्या ठिकाणी वास्तव्याला असलेल्या नागरिकांना शैलेश अग्रवाल यांनी लागलीच जागा देऊन झोपडी बांधकामासाठी बांबू, ताट्या उपलब्ध करुन दिल्या. आता ही जागा शासन अधिग्रहित करुन नागरिकांना देणार किंवा या जागेवर पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल योजनेतून लाभार्थ्यांना घर बांधून देण्यासाठी प्रयत्न करणार हे मंत्र्यांच्या बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे.
'ती' जागा गरिबांना होणार उपलब्ध
बाभूळगाव येथील ही जागा शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. या जागेच्या सभोवताली संपूर्ण भागात खासगी प्लॉट पडले असून, ही जागा शैलेश अग्रवाल यांनी अतिक्रमणधारकांना उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाकडे तयारी दर्शविली असल्याची माहिती विधानसभेत आमदार दादाराव केचे यांनी दिली. विधानसभेच्या पटलावर आ. केचे यांनी प्रश्न उपस्थित केल्यामुळे आता अतिक्रमणधारकांच्या घरकुलाचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे.
अशीही मानवता, वडिलांच्या मारेकऱ्यांना दिली जागा
शैलेश अग्रवाल यांनी त्यांच्या वडिलांच्या खून प्रकरणात आरोपी असलेल्या कुटुंबांची दुरवस्था लक्षात घेऊन त्या नागरिकांनाही जागा देत झोपड्या बांधण्यासाठी मदत केली. अतिक्रमणधारकांना आपल्याच अडीच एकर जागेपैकी सुमारे 25 हजार चौ. फूट जागेवर साहित्य उपलब्ध करून देत झोपड्या बांधून दिल्या. त्या ठिकाणी वीज, पाणी, रस्ते आदी सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या. आमदार केचे यांनीही याठिकाणी एक रस्ता बांधला. ही जमीन अद्यापही शैलेश अग्रवाल यांच्याच मालकीची असल्यामुळे झोपडपट्टीवासीयांना घरकुल मिळणे शक्य नाही, ही बाब लक्षात घेऊन आ. दादाराव केचे यांनी शैलेश अग्रवाल यांच्यासह यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. अग्रवाल यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून भाजप आमदारांच्या विनंतीचा स्वीकार करुन जागा घरकुल पट्ट्यासाठी उपलब्ध करून देण्यास तयारी दर्शविली आहे.