नागपूर (Nagpur) : ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व अनधिकृत बांधकामांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अधिवेशन संपल्यानंतर बैठक घेणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.
सदस्य संजय केळकर यांनी ठाण्यातील माजिवाडा, बाळकुम भागातील अनधिकृत बांधकामाबाबत लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. ठाण्यातील माजिवाडा येथे 200 चौरस फूट अनधिकृत बांधकाम आहे, ही वस्तुस्थिती आहे. या अनधिकृत बांधकामासंदर्भात एमआरटीपी कायद्यानुसार नोटीस बजावण्यात आली असून कारवाई सुरू आहे. बाळकुम येथील म्हाडा 1 व 2 मध्ये काही बांधकाम सुरू आहे. त्याबाबत एमआरटीपी कायद्यातील 268 नुसार कारवाई करण्यात येत आहेत. ठाणे मनपा क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात असल्याचेही मंत्री सामंत यांनी सांगितले.
ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून विकासकांनी ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे उभारली आहेत. ठाण्यातील या अनधिकृत बांधकामांच्या विषयाला 'टेंडरनामा'ने राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात वाचा फोडली आहे. "ठाण्यातील अनधिकृत बांधकामांमागे २०० रुपये चौरस फूट रेट फिक्स" हे वृत्त टेंडरनामाने प्रसिद्ध केले होते. अनधिकृत बांधकामांप्रकरणी ठाणे महानगरपालिकेच्या ११ सहायक आयुक्त तथा वॉर्ड ऑफिसर्सची खात्याअंतर्गत चौकशी 'डीई' सुरु करण्यात आली आहे. प्रत्येक महिन्यात तब्बल एकेक कोटींचा मलिदा पचवलेले वरिष्ठ मोकाट आणि तुलनेत कनिष्ठ सहाय्यक आयुक्तांना मात्र बळीचा बकरा बनवण्यात आले आहे.
याप्रकरणी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारला धारेवर धरले होते. आव्हाड यांनी या अनधिकृत बांधकामांमागचे अर्थकारण सुद्धा उघड केले आहे. अलीकडेच पालकमंत्र्यांनी सुद्धा ठाण्यातील अनधिकृत बांधकामांवर शिक्कामोर्तब केले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी बैठक घेऊन बेकायदा बांधकामांकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ठाण्यातील अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी ठाणे महापालिकेकडे तक्रार केली होती. तसेच यासंदर्भात त्यांनी न्यायालयात देखील धाव घेतली होती. त्यानंतर अनधिकृत बांधकामांची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठीत केली होती. अनधिकृत बांधकामांचा अहवाल तयार करण्यात आला होता. कळवा, दिवा आणि मुंब्रा परिसरातून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी आहेत. दरम्यानच्या काळात ठाणे शहरातील बेकायदा बांधकामांचा अहवाल असलेली ती फाईलच गायब करण्यात आली आहे. या फाईलमध्ये अनधिकृत बांधकामांची यादी, फोटो, व्हिडीओ सिडी, बांधकामांचे स्पॉट, अहवालाच्या नस्ती, ठराव इमारतींची नावे अशी महत्त्वाची माहिती होती. अधिकारी, बिल्डर्स, भूमाफियांना वाचवण्यासाठीच ही फाईल गायब केली असण्याची शक्यता आहे.