मंत्री आत्राम म्हणाले, रस्त्यांच्या कामात दिरंगाई केल्यास कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर कारवाई

Dharmarao Baba Atram
Dharmarao Baba AtramTendernama
Published on

गडचिरोली (Gadchiroli) : जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या रस्ते बांधकाम विभागाने तातडीने खड्डे बुजवून रस्ते दुरुस्त करावे. तसेच रस्ते बांधकामाची मंजुरी असतानाही ज्या कंत्राटदारांनी दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण केली नाही त्यांना आणि ही कामे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिला.

Dharmarao Baba Atram
Mumbai : विधानसभा निवडणुकीआधी म्हाडाची 'एवढ्या' घरांसाठी बंपर सोडत

जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी अहेरी मतदार संघातील विकासकामांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी संजय दैने, माजी जि. प. अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, सिनेट सदस्या तनुश्री आत्राम, अहेरी उपविभागीय अधिकारी आदित्य जीवने, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार उपस्थित होते. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आलापल्ली, लगाम, मार्कंडा, खमनपूर, आष्टी, भामरागड, सिरोंचा, रेपणपल्ली या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका होवू शकतो, त्यामुळे तातडीने या मार्गावरील खड्डे बुजविण्यात यावे. लगाम ते आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाला वनविभागाचीही परवानगी मिळाली आहे, त्यामुळे कोणतीही कारणे न देता येथील रस्ते बांधकामाची कामांना सुरुवात करावी. अहेरी येथे ब्लडबँकेच्या इमारतीकरिता 1 कोटी 70 लाख निधी मंजूर करण्यात आला असल्याने बांधकाम तातडीने पूर्ण करा. ब्लडबैंक सुरु करण्याच्या परवानगीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव तसेच राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष व जिल्हा नियोजन समिती सदस्य रवींद्र वासेकर, रायुकाँ जिल्हाध्यक्ष व जिल्हा नियोजन समिती सदस्य लीलाधर भरडकर उपस्थित होते.

Dharmarao Baba Atram
Nagpur : विदर्भातील रस्त्यांची का लागली वाट? दुरुस्तीही थांबली, जबाबदार कोण?

सार्वजनिक बांधकाम विभागाचे (क्र.2) कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे व सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्लीचे कार्यकारी अभियंता बळवंत रामटेके यांच्या कार्यपद्धतीबद्दल मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी नाराजी व्यक्त केली. भरबैठकीत दोन्ही अधिकाऱ्यांची त्यांनी खरडपट्टी काढली. नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून जादा भत्ते, सुविधा मिळतात, मग रस्त्यांची कामे धिम्या गतीने करून सामान्यांना वेठीस का धरता, असा खडा सवाल त्यांनी केला. कार्यपद्धतीत सुधारणा करा अन्यथा गुन्हा नोंद करण्यात येईल, असा सज्जड इशारा त्यांनी दिला. रस्ते, आरोग्य व शिक्षण या त्रिसूत्रीच्या विकासावर अधिक भर असल्याचे मंत्री आत्राम यांनी सांगितले. पेसा क्षेत्रातील मुलांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत शाळांमध्ये शिक्षक नियुक्त करणे, माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दर्जेदार भोजन देण्याचे व शिक्षणाधिकाऱ्यांनी स्वतः दुर्गम भागात भेट देऊन याची तपासणी करण्याचे, प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांची भरती करणे, पाणीपुरवठा योजनेच्या बंद पडलेल्या सोलार प्रणाली प्राधान्याने दुरुस्त करणे, सिरोंचा येथील खताचा 1200 मे.टन बफर साठा शेतकऱ्यांसाठी खुला करणे, पाऊस व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करणे आदी सूचना त्यांनी दिल्या.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com