अमरावती (Amravati) : जिल्हा वार्षिक योजना सन 2023- 24 ची प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, आदी कार्यवाही तत्काळ पूर्ण करून विहित मुदतीत ही कामे पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. यावेळी 371 कोटींच्या प्रारूप आराखड्याला नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. जिल्ह्यातील पाणंद रस्त्याच्या विकासासाठी लातूर जिल्हाधिकारी यांचा पॅटर्न राबविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्हा वार्षिक योजनेतील सन 2023-24 व सन 2024-25 चा प्रारूप आराखड्याचा आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नुकताच घेतला. जिल्हा नियोजन समितीची सभा नियोजन भवनात झाली.
बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, आमदार बळवंत वानखडे, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय, जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच विविध विभागप्रमुख, आदी उपस्थित होते. यावेळी सन 2023-24 च्या खर्चास मंजुरी व सन 2024-25 जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. बैठकीमध्ये उपस्थित खासदार, आमदार यांनी आदिवासी क्षेत्र व जिल्ह्यातील विविध विकासकामासाठी वाढीव निधीची मागणी केली. यावर निधी कमी पडू देणार नसल्याचे पालकमंत्री म्हणाले.
कामांसाठी लोकप्रतिनिधींद्वारा 1170 कोटींची मागणी :
बैठकीत 2023-24 व सन 2024-25 जिल्हा वार्षिक योजनेचा प्रारूप आराखडा सादर करण्यात आला. 2024-25 च्या प्रारूप आराखड्यात विविध यंत्रणांकडून सर्वसाधारण योजनेत 1170 कोटींची मागणी करण्यात आली आहे. तथापि, महत्त्वाच्या कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.