नागपूर (Nagpur) : नागपूर (Nagpur) आणि पुण्यात (Pune) मेट्रो रेल्वे (Metro Railway) विकसित करणाऱ्या महामेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने गाड्यांना ॲल्युमिनियम (Aluminum) कोचेस लावण्याचा निर्णय घेतला आहे. 'आत्मनिर्भर भारत' उपक्रमांतर्गत या कोचेसची निर्मिती करण्यात आली असून, त्यामुळे मेट्रो रेल्वेचे वजन कमी होऊन वेग वाढणार आहे. देशात पहिल्यांदाच मेट्रोच्या ॲल्युमिनियम कोचेसची कोलकाता येथील टिटागड वॅगन्स कंपनीत निर्मिती केली जात आहे.
ॲल्युमिनिअम कोचच्या निर्मितीमुळे 'मेक इन इंडिया'चे स्वप्न साकार होत आहे. या संपूर्ण कोचचे डिझाईन देशातच तयार झाले. नागपूर मेट्रोचे काम सुरू झाले, त्यावेळी देशात मेट्रो कोच निर्माण करणारी एकही कंपनी नव्हती. परंतु आज देशातच मेट्रोच्या कोचची निर्माण केली जात आहे. ॲल्युमिनिअम कोचेसचा मेट्रोसाठी उपयोग होणे हा एक महत्त्वाचा टप्पा महामेट्रोने गाठला आहे.
या कोचेसचे अनेक सुटे भाग देशात निर्माण झाले आहेत. नागूर आणि पुणे मेट्रो प्रकल्पात या कोचेसचा समावेश होणार आहे. पुणे मेट्रोसाठी टिटागड वॅगन्स १०२ कोचेसची निर्मिती करणार आहे.
नागपूर शहरात मेट्रो रेल्वेचा पहिला टप्पा पूर्णपणे विकसित केला आहे. या मार्गावर रोज चार गाड्या नियमितपणे धावत आहे. सकाळी सहा ते रात्री नऊ या दरम्यान मेट्रो धावते. प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद त्यास मिळतो आहे. हळूहळू प्रवाशांनी आता मेट्रोला आपलेसे करणे सुरू केले आहे. पुण्यातही लवकरच मेट्रो पूर्ण क्षमतेने धावणार आहे. त्यासाठी झपाट्याने कोचेस तयार केले जात असल्याचे मेट्रो रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
असा आहे ॲल्युमिनिअम कोच
- सर्वसाधारण कोचच्या वजनापेक्षा ६.५ टक्के कमी वजन.
- एका कोचची लांबी २९ मीटर व उंची ११.३० मिटर.
- कोचची रुंदी २.९ मिटर.
- प्रति कोचमध्ये ४४ व्यक्ती बसू शकतात.
- प्रत्येक ट्रेनमध्ये तीन कोच, पैकी एक महिलांसाठी आरक्षित.