नागपूर (Nagpur) : एकीकडे कोळशाची टंंचाई असताना दुसरीकडे वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेडच्या कोळसा खाणीमधून मोठ्या प्रमाणात कोळशाची चोरी होत आहे. यात नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्हे आघाडीवर असून, या भागातून आतापर्यंत तब्बल ५७८ मेट्रिक टन कोळसा चोरीला गेल्याचे उघड झाले आहे.
कोळसा चोरटे आणि 'वेकोलि'चे अधिकारी यांच्या संगनमताशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी होऊच शकत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. कोळसा ठेकेदारांचे एक रॅकेट या चोरीच्या मागे सक्रिय आहे. छोट्या छोट्या उद्योगांना लागणारा कोळसा याच रॅकेटमार्फत पुरविला जातो. सीआयएसएफ महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील खाणींमधून मागील दोन वर्षांत कोळसा चोरी करणाऱ्या ७० आरोपींना अटक करण्यात आली आहे. या भागातून ५७७.८९ मेट्रिक टन कोळसा चोरी झाला आहे. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नातून ही आकडेवारी समोर आली आहे. यावरून प्रशिक्षित सुरक्षा यंत्रणेअभावी कोळसा चोरी होत असल्याचे वास्तव यानिमित्ताने समोर आले आहे.
खासदार तुमाने यांनी संसदेत प्रश्न विचारून २०२१-२२ व २०२२-२३ या आर्थिक वर्षांत कोळसा चोरींच्या घटनांची माहिती मागविली होती. त्यावर कोळसा व खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लेखी उत्तर दिले आहे. उत्तरात कोळसा चोरीच्या घटना तुरळक असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. चोरीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर जीपीएस व जिओ फेंसिंग सिस्टम लावण्यात आली आहे. चेक पोस्ट तयार केल्या आहेत. वजनावर आधारित आरएफआयडी सिस्टम लावण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील खाणींमध्ये प्रशिक्षित विभागीय सुरक्षा व महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे सशस्त्र कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
नागपूरसह चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील कोळसा खाणींमधून मोठ्या प्रमाणात कोळसा चोरी होत असल्याची माहिती पत्राच्या माध्यमातून यापूर्वीच खासदार तुमाने यांनी कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांना दिली होती. कोळसा चोरी होत असल्याने 'वेकोलि'चे व महसुलाचे मोठे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले होते.