नागपूर (Nagpur) : मेंदू, हृदय, किडनीसह आणि पोटाशी निगडित गुंतागुंतीच्या आजारांवर विशेष उपचाराची सोय मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये असून गरीब रुग्णांसाठी सुपर वरदान ठरले आहे. यामुळेच सरकारने सुपरच्या विस्तारीकरणाचा अजेंडा केला. मेडिकलच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे निमित्त साधून रुग्णहितासाठी कोट्यवधीचा निधी खर्चून 'बी' आणि 'सी' विंगचे बांधकाम पूर्ण करण्याच्या प्रस्तावाला सरकारने हिरवा झेंडा दाखविला. यामुळे सुपरमध्ये येणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
सुपरच्या विस्तारीकरणासाठी प्रशासनाने बी आणि सी विंगच्या कामाचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व तयार संशोधन विभागाला सादर केला आहे. त्याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली. लवकरच सुपरमध्ये बांधकामाच्या कामाचे भूमिपूजन होईल. पहिल्या टप्प्यात अंदाजे 57 कोटी रुपयांच्या खर्चातून सुपरमधील ऑपरेशन थियेटरची संख्या वाढवण्यात येणार आहे. सध्या 8 ऑपरेशन थिएटर आहेत, लवकरच ही संख्या 16 होणार आहे. प्रशासनाने 'बी' आणि 'सी' विंगच्या यासोबतच काही वॉर्डींची भर पडेल.
सुपरसाठी स्वतंत्र आयसीयू, लेक्चर हॉल तयार करण्याचा देखील प्रस्तावात समावेश आहे. विंग 'सी'मध्ये नव्याने प्रस्तावित वॉर्ड आणि आयसीयूचा समावेश असेल. सध्याच्या इमारतीत कार्डिऑलॉजी आणि गेस्ट्रोएंट्रोलॉजीतील वरिष्ठ निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा सुविधा नाहीत. विस्तारीकरणात त्यासाठी बी विंगमध्ये 15 कोटी रुपये खर्चून प्रशासकीय इमारतही बांधली जाणार आहे. सध्याच्या सुपरमधील इमारतीत गैस्ट्रोएंटरोलॉजी, न्युरॉलॉजी, न्यूरो सर्जरी, कार्डिऑलॉजी, नेफ्रोलॉजी, युरो सर्जरी व कॉर्डियोथोरेसीस असे 7 विभाग कार्यरत आहेत. त्यापैकी गैस्ट्रोएन्ट्रोलॉजी आणि कार्डिऑलॉजी विषयातच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा आहेत. विस्तारणानंतर सुपरधील सर्वच विभागांमध्ये अभ्यासक्रमाच्या जागा पदव्युत्तर वाढणार आहेत.
सुपरमधील विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. विदर्भात वैद्यकीय संशोधनाच्या संधी वाढतील. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढत आहेत. यामुळे गावखेड्यापर्यंत एमबीबीएस डॉक्टरांची सेवा उपलब्ध होणार आहे. याचा अप्रत्यक्षरित्या गरीब रुग्णांना होणार आहे. अशी माहिती मेडिकल अधिष्ठाताचे डॉ. राज गजभिये यांनी दिली.