नागपूर (Nagpur) : जगभरातील बौद्ध बांधवाच्या श्रद्धेचे प्रतिक असलेल्या दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरण व विस्तारीकरणाच्या कामाला मार्चनंतर सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात दोनशे कोटींच्या कामे केली जाणार असून यात संपूर्ण संरक्षक भिंत दगडाची करण्यात येणार आहे. याशिवाय स्तुपाभोवती परिक्रमा मार्ग तसेच प्रवेशद्वाराची रुंदी वाढविण्यात येणार असून भूमीगत पार्किंग व्यवस्थाही राहणार असल्याने पुढील दोन वर्षात दीक्षाभूमी नव्या रुपात दिसून येणार आहे.
दीक्षाभूमीला राज्य सरकारने ‘अ’ वर्गातील पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. धम्मचक्र प्रवर्तनदिनासह वर्षभर येथे जगातून बौद्ध बांधव येतात. त्यामुळे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ करण्याची जबाबदारी राज्य सरकारने नागपूर सुधार प्रन्यासने तयार केली आहे. नासुप्रने नोएडा येथील डिझाईन असोसिएट्सकडून आराखडा तयार केला. यात धम्मचक्र प्रवर्तनदिनाबाबत होणाऱ्या मुख्य कार्यक्रमासाठी व्यासपीठाचा समावेश आहे. याशिवाय दगडी सुरक्षा भिंत उभारण्यात येणार आहे. सध्या पार्किंगच्या जागेमध्येच भूमिगत पार्किंगची सोय करण्यात येणार असून ४०० कार, एक हजार दुचाकी व एक हजार सायकलची पार्किंग करता येणार आहे.
विशेष म्हणजे मुख्य स्तुपाच्या प्रवेशद्वाराचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. यात प्रवेशद्वाराची रुंदी वाढविण्यात येणार आहे. याशिवाय स्तुपाभोवती परिक्रमा पथ तयार करण्यात येत आहे. स्तुपाच्या बाजूलाच खुले सभागृह राहणार आहे. संपूर्ण परिसर फुलझाडे, हिरवळीने आच्छादित केली जाणार आहे. यासाठी दीक्षाभूमीच्या मालकीच्या २२.८० एकर जागेचा वापर केला जाणार आहे. विशेष म्हणजे परिक्रमा मार्गासाठी दीक्षाभूमी लगतची केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या मालकीची ३.८४ एकर जागाही घेण्यात येणार आहे. ही सर्व कामांसाठी दोनशे कोटींचा खर्च येणार आहे. राज्य सरकारने ४० कोटी रुपये दिले आहेत. २५ कोटी रुपये सामाजिक न्याय विभागाने तरतूद केली आहे. त्यामुळे कामांची सुरुवात करण्यास कुठलाही अडथळा नसल्याचे नासुप्र सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांनी नमुद केले.
कन्व्हेंशन सेंटर सज्ज
गेल्या अऩेक वर्षांपासून रखडलेल्या कामठी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटरची कामे पूर्णत्वास आली आहे. ११३ कोटींच्या या प्रकल्पाची जबाबदारी घेताच नासुप्रने कामाला वेग दिला. या कन्व्हेंशन सेंटरमध्ये बेसमेंट पार्किंग, तळ मजला पार्किंग असू चारशे व्यक्तिंच्या क्षमतेचा बॅंक्वेट हॉल, डायनिंग हॉल, चन, स्टोअर रूम आहे. याशिवाय बिझनेस सेंटर, कॉन्फरन्स हॉल, मिडिया सेंटर, मिटिंग रुम, रेस्टॉरंट, ई-लायब्ररीची सुविधा आहे. दर्शनी भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ४० फूट उंचीचा धातूचा पुतळा उभा करण्यात येणार आहे. या कन्व्हेंशन सेंटरची कामे अंतिम टप्प्यात असून येत्या १४ एप्रिलला लोकार्पण होण्याची शक्यता आहे.