नागपूर (Nagpur) : राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने सीताबर्डी येथील प्राचीन गणेश टेकडी मंदिराला पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिला आहे. यासंदर्भातील परिपत्रक पर्यटन विभागाने 29 मार्च रोजी जारी केले होते. मंदिराच्या विकासकामांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.
17 मार्च 2018 रोजी नागपुरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी टेकडी गणेश मंदिराला पर्यटन क्षेत्राचा दर्जा देऊन निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊनही माविआ आघाडी सरकारने 2019 मध्ये कोणतेही पाऊल उचलले नाही. सामाजिक कार्यकर्ते भूषण दडवे यांनी भाजपच्या सर्व आमदारांना पत्र पाठवून पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे लक्ष वेधले. विशेषतः आमदार कृष्णा खोपडे यांनी पुढाकार घेत मंत्री लोढा यांची मुंबईत भेट घेतली. तात्काळ हस्तक्षेप करून लोढा यांनी 29 मार्च रोजी टेकडी मंदिराला पर्यटन स्थळ म्हणून मान्यता दिली आणि 5 कोटी रुपयांचा विकास निधीही दिला. मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याला भव्य स्वरूप दिले जात असल्याचे उल्लेखनीय आहे. विकासकामांबरोबरच पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळाल्याने देशातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांमध्ये याचा समावेश झाला आहे.
मंदिराचे निर्माण गुलाबी रंगाच्या पाषाणापासून
गणेश टेकड़ी मंदिराला पूर्णतः नवीन लूक मिळत आहे. मंदिराला भव्य स्वरूपात साकारण्यात येत आहे. मंदिराचे निर्माण गुलाबी रंगाच्या पाषाणापासून करण्यात येत आहे. मंदिरात अजूनही बांधकाम सुरु आहे. मंदिराचे नवीन रूप गुलाबी रंगात रंगलेले दिसून येणार आहे. टेकडी गणपती मंदिर हे नागपूर रेल्वे स्थानकाजवळ असलेले प्राचीन गणपती मंदिर आहे. हे नागपुरातील लोकप्रिय मंदिर आहे. हे मंदिर टेकडीवर असल्याने टेकडी गणपती मंदिर असे म्हटले जाते. नागपूरचे राजे भोसले यांनी सुमारे 18 व्या शतकात हे मंदिर बांधल्याचे समजते. भोसले राजे आणि ब्रिटिशांची लढाई ज्या ठिकाणी झाली, त्याच ठिकाणी हे गणपतीचे मंदिर आहे. विशेष म्हणजे टेकडीचे गणपति हे विदर्भातिल अष्टविनायक पैकी एक आहे. नेहमीच येथे गणपतीबाप्पाच्या दर्शनासाठी भविकांची गर्दी दिसून येते.