नागपूर (Nagpur) : महाराजबाग प्राणी संग्रहालयाच्या बहुप्रतीक्षित बृहत आराखड्याला तब्बल एक तपानंतर मंजुरी देण्यात आली आहे. नवी दिल्ली येथील केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने याला हिरवा कंदील दिला आहे. राज्य सरकारकडे 84 कोटींचा महाराजबाग विकासाचा प्रस्ताव पाठविला आहे. त्याला आता गती मिळण्याची शक्यता आहे.
महाराजबाग प्राणी संग्रहालयाचे व्यवस्थापन पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत करण्यात येते. संग्रहालयाचा बृहत विकास आराखडा 2011 साली केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाला सादर केला होता. तब्बल चार वेळा प्राधिकरणाने महाराजबाग प्रशासनाला यात सुधारणा करण्यास सांगितले. चार वेळा तो सुधारणांसाठी परत पाठवला. प्रत्येकवेळी महाराजबाग प्रशासनाने सुधारणा केल्या. 14 डिसेंबर 2022 ला तो पुन्हा एकदा प्राधिकरणाला सुधारणा करून पाठवण्यात आला. 2011 पासून प्राधिकरणाने सुचवलेल्या दुरुस्त्यामध्ये महाराजबाग सोसायटीमार्फत संचालित करावे, प्राणीसंग्रहालात सुरू असलेल्या प्रातः भ्रमण थांबवावे, आवश्यक पदे किमान कंत्राटी पद्धतीने भरावी, प्रशासकीय पदानुक्रम सुधारित करावा आदींचा समावेश होता.
महाराजबाग प्राणी संग्रहालयाच्या विकासाकरिता व भविष्याच्या दृष्टीने केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने बृहत विकास आराखड्याला दिलेली मंजुरी महत्त्वाची आहे. भविष्यात महाराजबाग परिसराचा विकास प्राणी संग्रहालयाच्या नियमांच्या अधीन राहून करण्यात येणार आहे. 84 कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविलेला आहे. त्याला मंजुरी मिळविण्यासाठी आता राज्यसरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल. अशी माहिती महाराजबाग प्राणिसंग्रहालयचे प्रभारी डॉ. सुनील बावस्कर यांनी दिली. आराखडा मंजूर झाल्यामुळे आता प्राणी संग्रहालयाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. आराखडा मंजूर नसल्याने विकास थांबला होता. आता मंजुरीनंतर महाराजबाग उद्यान तसेच प्राणिसंग्रहालयाचा विकास करता येणार असल्याची माहिती कृषी महाविद्यालय सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश कडू यांनी दिली.