नागपूर (रामटेक) : रामटेक येथील पौराणिक इतिहासाचा वारसा लाभलेल्या गडमंदिरावरील विकास कामे होत नसल्याने, रामटेकचे महत्त्व तसुभरही कमी झालेले नाही. मात्र, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार पर्यटक व्यवस्था, स्वच्छतागृह, मुत्रीघर, रोजगार वाढीसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना झालेल्या नसल्याने अपेक्षित असलेला व्यवसाय वाढला नाही आणि त्याद्वारे संपणारी बेरोजगारी दूर झालेली नाही. त्यामुळे मानव विकास निर्देशांक कमी राहिला. आता तरी गडमंदिराचा हा वनवास संपेल का, असा प्रश्न उपस्थित व्हायला लागला आहे.
रामटेक परिसर नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला आहे. श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने हा परिसर पवित्र झालेला आहे. येथे त्यांच्या पादुकाही आहेत. 1500 वर्षांपूर्वीचे वाकाटक राजे आणि नंतरच्या राजांना या पादुकांचे भक्तिभावाने जतन केले. कवीकुलगुरू कालिदासासारखा रसिकोत्तम येथील सौंदर्याने आणि पावित्र्याने भारावून गेला. येथे श्रीराम, सीता व लक्ष्मण यांच्या देवळांसह ऐतिहासिक त्रिविक्रम, वराह, केवल नृसिंह, रुद्र नृसिंह, भोगराम, गुप्तराम आदींचेही देवळे आहेत. येथे पवित्र अंबाळा तलावही आहे. या सर्वांचा विकास व्हावा आणि रामटेकला आलेला पर्यटक, तीर्थयात्रेकरू सुखावून जावा म्हणून महाराष्ट्र शासनाने 21 मे 2018 रोजी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी दिली. यापूर्वी माजी आ. आनंदराव देशमुख यांच्या काळातही 150 कोटींचा आराखडा मंजूर झाला होता. मात्र, विकास होऊ शकला नाही. 2018 मधील आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात 49.28 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून एकही मुत्रीघर सुरू झालेले नाही. भक्तनिवास, ज्ञानसाधना केंद्र आदींची कामे कासवगतीने सुरू आहेत. रोप वे, बगिचे, संगीत कारंजे, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, सुंदर पथदिवे, आकर्षक प्रवेशद्वार व इतर अनेक सौंदर्यीकरणासाठीचा निधी अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे, कालिदास स्मारकाची दुरवस्था झालेली आहे. बगिचे, संगीत कारंजे, विद्युत रोषणाई बंद पडलेले आहेत.
हे स्मारक संस्कृत विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाहीही थंडबस्त्यात गेली आहे. रामटेक येथील गडमंदिराची मालमत्ता 1968 पासून पब्लिक ट्रस्ट म्हणून जाहीर करण्यात आली आहे. राजे रघुजी यांनी देवगडच्या स्वारीत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्याने अगणित धन खर्च करून मंदिराच्या रक्षणार्थ लढाऊ किल्ला बांधला व मोठ्या प्रमाणात जंगम मालमत्ता अर्पण केली. पण, आता मंदिराबाबत कोर्टात वाद सुरू असल्याने प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी हे काम बघत आहेत. मात्र, हात बांधले गेल्याने विकासकामे करता येत नाहीत. रामटेक नगरपरिषदही तीर्थक्षेत्र विकास करण्यासाठी काही करताना दिसत नाही. त्यामुळे रामटेकमध्ये विकासाची गंगा केव्हा उतरणार, हा प्रश्न आहे.